लोणावळा : लोणावळ्यातील कार्ला येथे पिता-पुत्राच्या जोडीने मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहूब मेणाचा पुतळा साकारला आहे. कार्ला येथील वॅक्स म्युझियममध्ये पुतळा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे जरांगे हे प्रसिद्धी झोतात आले आहेत. ते मराठा आरक्षणासाठी आग्रही असून, त्यांचे हे काम पुढील पिढीला कळावे म्हणून कार्ला येथील पुतळा आर्टिस्ट ऋषीकेश म्हाळसकर आणि अशोक म्हाळसकर या पिता-पुत्राच्या जोडीने जरांगे यांचा पुतळा साकारला आहे. यासाठी जरांगे पाटील यांना भेटून म्हाळसकर यांनी मेणाचा पुतळा बनवण्यासाठी परवानगी आणि मोजमाप घेतले होते. एरवी सहा महिने मेणाचा पुतळा बनवण्यासाठी लागतात. मात्र, ऋषिकेश म्हाळसकर यांनी अवघ्या तीन महिन्यांत हा मेणाचा पुतळा साकारला आहे. बारकाईने आणि हुबेहूब पुतळा बनवणे हे म्हाळसकर यांच्यापुढे मोठे आव्हान होते. परदेशातून मेन आणून जरांगे यांचा पुतळा साकारण्यात आला आहे, अशी माहिती ऋषिकेश म्हाळसकर यांनी दिली.
मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत. ठीकठिकाणी मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत केले जात आहे. मुंबईकडे निघालेल्या त्यांच्या पायी दिंडीचा लोणावळ्यात चौथा मुक्काम होणार आहे. त्यामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाची इतिहासात नोंद व्हावी, यासाठी प्रत्येक मराठा होईल तो प्रयत्न करत आहे. अशातच पुण्यातील मावळ तालुक्यातील बाप-लेकाने मनोज जरांगे यांच्या सारखा दिसणारा मेणाचा पुतळा तयार केला आहे.
पुतळा उभारण्यासाठी त्यांना तीन महिन्यांचा वेळ लागला. मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला असून, पुतळ्याची उंची पाच फूट सात इंच इतकी आहे. तर, हुबेहूब जरांगे पाटील साकारण्याचा प्रयत्न म्हाळसकर कुटुंबीयाने केलाय. त्यामुळे, हा पुतळा पाहण्यासाठी अनेक मराठा युवक येथे येऊ लागलेत. तर, जरांगे यांच्या पुतळ्यासोबत सेल्फी घेण्यासाठी देखील तरुण गर्दी करतांना पाहायला मिळत आहे.
याबाबत बोलताना पुतळा तयार करणारे अशोक म्हाळसकर म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्तापर्यंत ५७ ते ५८ मोर्चा काढण्यात आले. त्यामुळे समाजासाठी आणि मनोज जरांगे यांच्यासाठी काहीतरी करावा अशी आमची इच्छा होती. याबाबत आमच्या कुटुंबीयांची चर्चा सुरू होती. अशात मनोज जरांगे यांचा मेणाचा पुतळा बनवण्याचा आमचा निर्णय झाला. यासाठी आम्ही मनोज जरांगे यांचं मोजमाप घेतलं. मेणाचा पुतळा बनवण्यासाठी मोठ्या मुश्किलीने त्यांची परवानगी मिळाली. असा पुतळा तयार करण्यासाठी सहा महिने ते एक वर्ष लागतो. परंतु रात्र आणि दिवस कष्ट घेत आम्ही तीन महिन्यात हा पुतळा तयार केला. विशेष काही अशा अडचणी आम्हाला आल्या नाही, पण थोडेफार आणखी काम बाकी आहे. उद्यापर्यंत हे काम पूर्ण होईल, असे म्हाळसकर म्हणाले.
लोणावळ्यात मुक्काम असल्याने जरांगे पाटील हे वॅक्स मूजियमला भेट देणार असल्याचे लोणावळा सकल मराठा विभाग प्रमुख भाऊ हुलावळे आणि किरण गायकवाड यांनी सांगितले.