लोणी काळभोर, (पुणे) : लोकांची प्रलंबित कामे व जी चालू कामे सुरु आहेत ती सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. शेतकरी बांधवांच्या फेरफारवरील तक्रारींचे निवारण विनाविलंब करण्यात येईल, अशी ग्वाही लोणी काळभोरच्या प्रथम मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथे दत्त मंदिराच्या पाठीमागे मंडल अधिकारी या नवीन कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २९) नूरजहाँ सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सय्यद बोलत होत्या. माजी उपसभापती सनी काळभोर, हेमलता बडेकर, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, उपसरपंच प्रियांका काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, माजी उपसरपंच ज्योती काळभोर, ग्रामपंचायत सदस्य भरत काळभोर, नागेश काळभोर, सविता लांडगे, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर, अमित काळभोर, राजेंद्र काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी उपसभापती सनी काळभोर म्हणाले, “शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी योग्य पद्धतीने निर्णय घेऊन मंडलाधिकारी कार्यालय हे लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत आणले. यामुळे कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, आळंदी म्हातोबाची, तरडे या गावातील शेतकरी, व नागरिकांची कामे सुलभतेने होतील.
सरपंच योगेश काळभोर म्हणाले, “लोणी काळभोर, कदमवाकवस्ती ही मोठी गावे आहेत. यासाठी शेतकरी, नागरिकांना थेऊर या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत होते. लोणी काळभोर या ठिकाणी झालेल्या कार्यालयाचा उपयोग या ठिकाणी असलेल्या हजारो शेतकऱ्यांना होणार आहे”.
सिद्राम मळा येथे तलाठी सजा कार्यालय होणार
लोणी काळभोर या नवीन सर्कल सजामध्ये लोणी काळभोर, सिद्राम मळा, कदमवाकवस्ती, आळंदी म्हातोबाची, तरडे या तलाठी सजाचा समावेश असून, लोणी काळभोरमध्ये नव्याने सिद्राम मळा येथे तलाठी सजा कार्यालय होणार आहे. तसेच संबंधित गावे व तलाठी सजा थेऊर सर्कलमधून वगळण्यात आली आहेत.
आर्थिक वेठीस धरण्याच्या प्रकाराने जनता त्रस्त
अगोदरच थेऊर सर्कलच्या विविध कारनाम्यांमुळे व कारभारामुळे नागरिकांना आर्थिक वेठीस धरण्याचा प्रकार वाढल्याने येथील जनता कंटाळलेली होती. त्यातच थेऊर सर्कलमधून लोणी काळभोर या नवीन सर्कलची निर्मिती झाल्याने थेऊर मंडल अधिकारी कार्यालयात आता थेऊर, कुंजीरवाडी, कोलवडी, मांजरी बुद्रुक, महादेवनगर व मोरे वस्ती या तलाठी सजाचा समावेश राहिला आहे.