तळेगाव ढमढेरे: विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर येथील आठवडा बाजार एक जानेवारी रोजी बंद ठेवण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी हरेश सूळ यांनी संबंधित ग्रामपंचायतीना पत्राद्वारे दिला आहे.

शिक्रापूर येथे रविवार ३१ डिसेंबर रोजी, तर तळेगाव ढमढेरे येथे सोमवार १ जानेवारी रोजी भरणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याचा आदेश दोन्ही ग्रामपंचायतींना प्राप्त झाला आहे. त्यानुसार बाजार बंद ठेवण्याच्या सूचना सर्वांना दिल्याचे तळेगाव ढमढेरेच्या सरपंच अंकिता भुजबळ आणि शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले.

हे दोन्ही बाजार मोठे असल्याने येथे नागरिकांची गर्दी होत असते. तसेच एक जानेवारी रोजी पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रभरातून येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही आठवडे बाजार बंद राहणार आहेत. या दोन्ही गावांमध्ये विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था केली आहे. त्यामुळे दोन्ही गावांचे आठवडा बाजार बंद राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.







