पुणे : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे सध्या दुहेरी धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या ‘खाशाबा’ या आगामी भव्य चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असतानाच, आता ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर एका वेगळ्या भूमिकेतून लोकांच्या भेटीस येत आहेत. मराठी ‘झी५’ वाहिनीने त्यांच्या ‘फ्रेम’ या नव्या ओरिजिनल सिनेमाची घोषणा केली असून, नुकताच या चित्रपटाचा प्रभावी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट 10 जुलै 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विक्रम पटवर्धन यांचे लेखन आणि दिग्दर्शन लाभलेल्या ‘फ्रेम’ या चित्रपटात न्यूजरूममधील पत्रकार आणि छायाचित्रकारांचे जग दाखवण्यात आले आहे. पुण्यातील एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या पार्श्वभूमीवर ही कथा फिरते. यामध्ये व्यावसायिक कर्तव्य आणि मानवी भावना यांमधील संघर्ष अतिशय संवेदनशीलतेने मांडण्यात आला आहे. नागराज मंजुळे यांच्यासोबत अमेय वाघ, मुग्धा गोडसे आणि अक्षया गुरव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाची कथा एका भीषण भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आधारलेली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडत असताना आधी फोटो काढायचा की संकटग्रस्तांना मदत करायची, हा गंभीर नैतिक प्रश्न पत्रकारांसमोर उभा ठाकतो. यात नागराज मंजुळे यांनी ‘चंदू पानसरे’ या अनुभवी आणि तडजोड न करणाऱ्या ज्येष्ठ छायाचित्रकाराची भूमिका साकारली आहे. त्यांच्या मते, कोणत्याही परिस्थितीत वास्तवाचे चित्रण करणे हेच त्यांचे पहिले कर्तव्य आहे.
याउलट, अमेय वाघ याने ‘सिद्धार्थ देशमुख’ नावाच्या एका तरुण, आदर्शवादी आणि संवेदनशील पत्रकाराची भूमिका साकारली आहे, जो पत्रकारितेत माणुसकी जपण्याचा प्रयत्न करतो. “आधी फोटो, मग बाकी सगळं” असा विचार करणारा चंदू आणि माणुसकीला प्राधान्य देणारा सिद्धार्थ यांच्यातील वैचारिक वाद हाच या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना नागराज मंजुळे म्हणाले की, चंदू हा पारंपरिक नायक नाही, त्यामुळे ही भूमिका आव्हानात्मक होती. तर अमेय वाघच्या मते, सिद्धार्थचा संघर्ष आजच्या तरुण पिढीच्या मनातील प्रश्नांना वाट करून देईल. एकंदरीत, केवळ ब्रेकिंग न्यूजच्या पलीकडे जाऊन त्यामागील मानवी भावविश्व उलगडणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच विचार करायला भाग पाडेल.






