पुणे : पुण्यातील धनकवडी परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून कोणतीही परवानगी, ओटीपी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक न करताच तब्बल 9 लाख 75 हजार रुपयांची रक्कम लुटण्यात आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,. दिवसभर काम करून आणि रात्रीचे जेवण आटोपून हे वृद्ध व्यक्ती गाढ झोपेत होते. त्यांच्या फोनवर ना कोणता कॉल आला होता, ना त्यांनी कोणाला पासवर्ड किंवा ओटीपी सांगितला होता. तरीही सायबर चोरांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवला. मध्यरात्रीच्या वेळी काही मिनिटांतच त्यांच्या खात्यातून एकामागून एक अनेक व्यवहार झाले आणि संपूर्ण आयुष्यभराची जमापुंजी झटक्यात गायब झाल्याची 16 ऑक्टोबरची घटना उघडकीस आली.

सकाळी जेव्हा ते झोपून उठले आणि त्यांनी फोनवरील मेसेज पाहिले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बँक खाते पूर्णपणे रिकामे झाले होते. त्यांनी तातडीने बँकेत जाऊन खाते गोठवले आणि सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, भामट्यांनी ‘रिमोट एक्सेस’ किंवा मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने इन्स्टॉल केलेल्या मालवेअरचा वापर करून हा सगळा प्रकार केला आहे. कोणतीही माहिती शेअर न करता अशा प्रकारे पैसे चोरीला गेल्यामुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सध्या सहकारनगर पोलीस आणि सायबर सेल या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी अशा प्रकारच्या डिजिटल फसवणुकीपासून सावध राहणे गरजेचे बनले आहे.







