पुणे : पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरात व्हॉट्सॲप स्टेटसवरून झालेल्या एका क्षुल्लक वादातून अत्यंत भीषण प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलाने ठेवलेल्या स्टेटसचा राग मनात धरून इतर अल्पवयीन मुलांनी त्याच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि खळबळीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरूळे येथे 30 ऑगस्ट रोजी एक खुनाची घटना घडली होती. या प्रकरणातील काही संशयित नुकतेच बालसुधारगृहातून बाहेर आले होते. त्यानंतर जखमी मुलाच्या एका नातेवाईकाने आणि मित्राने ‘किंग इज बॅक’ अशा आशयाचे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस पाहून संतापलेल्या काही अल्पवयीन मुलांनी या तरुणाचा बदला घेण्याचा निर्णय घेतला.

मंगळवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. संबंधित पीडित मुलगा एका कपड्यांच्या दुकानात काम करत होता. दबा धरून बसलेल्या चार अल्पवयीन मुलांनी अचानक दुकानावर चाल केली आणि कसलाही विचार न करता त्याच्यावर कोयत्याने सपासप वार सुरू केले. या भयानक हल्ल्यात मुलाच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून, बचावाच्या प्रयत्नात त्याच्या उजव्या हाताचा अंगठाही तुटला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या मुलाला शेजारच्या एका ओळखीच्या व्यक्तीने तातडीने तळेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

घटनेची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ सूत्रे हालवली आणि वेगाने तपास चक्रे फिरवली. काही तासांच्या आतच पोलिसांनी वरूळे येथून दोन आणि तळेगाव दाभाडे येथून दोन अशा एकूण चारही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र, लहान वयातील मुलांमध्ये वाढणारी हिंस्र प्रवृत्ती आणि किरकोळ कारणावरून कोयत्यासारख्या घातक शस्त्रांचा होणारा वापर यामुळे नागरिक चिंतेत आहेत.






