पुणे : पुण्यातील ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स’मधील एका कर्मचाऱ्यावर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकारामुळे शैक्षणिक आणि संशोधन वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, NCRA संस्थेत 24 मे रोजी ‘वर्क असिस्टंट’ पदासाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, परीक्षा होण्याच्या एक दिवस आधी, म्हणजेच 23 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी, आरोपी कर्मचारी विवेक बबन हडवळे (वय 40) याने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका बाहेर लीक केल्याचा संशय आहे.
या प्रकरणाचा पर्दाफाश तब्बल 13 महिन्यांनी, म्हणजेच जून 2026 मध्ये झाला. मुंबईच्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ (TIFR) च्या दक्षता विभागाला एका गोपनीय स्रोताकडून या पेपर लीकबद्दल माहिती मिळाली. संबंधित माहितीदाराने व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉट्स आणि लीक झालेली प्रश्नपत्रिका प्रशासनाकडे सादर केली. दक्षता विभागाने जेव्हा ही प्रत मूळ प्रश्नपत्रिकेशी तपासून पाहिली, तेव्हा दोन्ही हुबेहूब जुळल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी TIFR चे दक्षता अधिकारी वैभव पांडुरंग शेरकर यांनी पुण्याच्या चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विवेक हडवळे विरोधात ‘ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, 1923’ च्या कलम 3(5) आणि नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 316(2) व 316(5) नुसार कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यामध्ये आणखी कोणाचे सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.







