पुणे : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त आज रविवारी (15 नोव्हेंबर) पुण्यात ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, चतु:शृंगी आणि बाणेर परिसरातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले आहेत. रविवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत हे बदल लागू करण्यात आले आहेत . वाहनचालकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंनी आपली वाहने नदीपात्रातील रस्ता, न्यू इंग्लिश स्कूलचे मैदान तसेच स. प. महाविद्यालयाच्या मुख्य मैदानाचा भाग वगळून आजूबाजूच्या परिसरात पार्क करावीत, अशा सूचना वाहतूक पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
वाहतुकीसाठी बंद राहणारे मुख्य रस्ते:

फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता (नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता) पूर्णपणे बंद असेल.

गणेशखिंड रस्त्यावरील कृषी महाविद्यालय चौकापासून विद्यापीठ चौकाकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात येईल.
विद्यापीठ चौक ते पाषाण चौक आणि पुढे बावधन चौकापर्यंतचा मार्ग बंद राहील.
सेनापती बापट रस्त्यावर सिम्बायोसिस ते बीएमसीसी महाविद्यालयादरम्यान वाहतूक बंद ठेवली जाईल.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग:
मध्य पुणे आणि पेठांचा भाग: स्वारगेटहून टिळक रस्त्याने डेक्कनकडे जाणारी वाहने पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने वळवली जातील. लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग चौकातून टिळक चौकाकडे जाणाऱ्यांनी सेवासदन चौकातून बाजीराव रस्त्याचा वापर करावा, तर केळकर रस्त्यावरील वाहनांनी भिडे पुलावरून पुढे जावे.
कर्वे रस्ता आणि डेक्कन: कर्वे रस्त्याने खंडुजीबाबा चौकाकडे जाणारी वाहने नळस्टॉप चौकातून उजवीकडे वळून म्हात्रे पुलामार्गे जातील. जंगली महाराज रस्त्यावरून स. गो. बर्वे चौकाकडे जाणारी वाहतूक झाशीची राणी चौकातून डावीकडे वळवण्यात येईल.
शिवाजीनगर आणि पाषाण: वेधशाळा चौकातून चापेकर चौकाकडे जाणाऱ्यांनी संचेती चौक आणि अभियांत्रिकी चौकमार्गे जावे. थोरात चौकातील वाहतूक दीपबंगला चौकातून, तर विधी महाविद्यालय चौकातील वाहने आठवले चौकातून पुढे जातील. पाषाणमधील सूस रस्त्यावरील वाहतूक बालाजी मंदिर व महाबळेश्वर हॉटेल चौकातून वळवण्यात आली आहे.






