पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा प्रचार नुकताच थंडावला असून, येत्या शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक पूर्णपणे शांततेत, निर्भय आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मतदारांना कोणत्याही दबावाशिवाय आपला हक्क बजावता यावा यासाठी संबंधित मतदान क्षेत्रांमध्ये मद्यविक्रीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या ठिकाणीही दारूची दुकानें बंद असणार आहेत

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नागपूर आणि अमरावती विभागात ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून ते 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत सर्व मद्यविक्रीची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यातही 21 ऑक्टोबरच्या दुपारी 4 वाजल्यापासून ते 23 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया संपेपर्यंत सर्व वाइन शॉप्स, बिअर शॉपी, बार आणि परमिट रूम्स बंद राहतील.

याशिवाय, पुण्यातील मतदान केंद्रांच्या परिसरातील गावांमध्येही ड्राय डे असणार आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या आदेशानुसार, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र असलेल्या गावांमध्ये आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक व घेडेगाव, इंदापूरमधील बावडा, खेडमधील राजगुरुनगर आणि बारामती तालुक्यातील लोणीभापकर या गावांचा समावेश आहे. प्रशासनाच्या या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन व्यापारी, ग्रामपंचायती आणि नागरिकांना करण्यात आले असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील या 5 जागांसाठी एकूण 182 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. यासाठी प्रशासनाने एकूण 2 हजार 499 मतदान केंद्रांची जय्यत तयारी केली असून, 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होईल. त्यानंतर आगामी 27 ऑक्टोबर 2026 रोजी मतमोजणी पार पडेल. प्रशासनाने सर्व मतदारांना शांततेत मतदान करण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.






