पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपासाला वेग आला असून या प्रकरणात धक्कादायक उलगडे समोर येत आहेत. या प्रकरणातील प्रमुख आरोपी सिया गोयल हीनं दोन दिवसांपूर्वी कोर्टातून बाहेर पडत असताना माध्यमांसमोर आक्षेपार्ह इशारा केला असल्याचा आरोप केला जात होता. यामुळं सियाला टार्गेटही करण्यात आलं होतं. पण आता यामध्ये नवा ट्विस्ट आला असून सियानं अश्लील कृत्य खरंच केलं होतं का? याचा खुलासा तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस तिला वाहनातून नेत असताना ही घटना घडली. तिचे मधले बोट वाहनाच्या दरवाजाच्या फटीत अडकल्यानं तिला दुखापत झाली होती, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. दुखापतीमुळंच तिनं ते बोट वर धरलं होतं.माध्यमांकडे पाहून जाणीवपूर्वक केलेली ती कोणतीही आक्षेपार्ह कृती नव्हती, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

केतन अगरवाल हत्येतील आरोपी सिया गोयल हिला पोलीस घेऊन जात असताना तिने कथितरित्या मधले बोट दाखवल्याचे दृश्य समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर, तिच्या कुटुंबीयांनी आता स्पष्टीकरण दिलं असून, माध्यमांचा किंवा जनतेचा अनादर करण्याच्या उद्देशाने तिनं ती कृती केली असल्याचा दावा फेटाळून लावला आहे.
सियाची दोन बोटे वाहनाच्या दरवाजाच्या फटीत अडकली. तिच्या एका हातावर पट्टी बांधलेली आहे आणि एका बोटाला प्रचंड सूज आली आहे. तिची नखंही निळी पडली आहेत. सोशल मीडियावर या घटनेचं ज्या प्रकारे चित्रण केलं जात आहे, ते पूर्णपणे चुकीचं आणि दुर्दैवी आहे,” असं सियाच्या वडिलांनी एका व्हिडिओ निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे.
केतन अग्रवाल हत्याप्रकरणात पोलीस कोठडीत नेलं जात असताना आरोपी सिया गोयलच्या वर्तनावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि सोशल मीडियावर या दृश्यांवरून मोठी चर्चा व टीका झाली होती, त्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.







