न्हावरे : मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील परिसरातील कोळपेवस्ती येथे देवकार्य आणि खेळाच्या कार्यक्रमानंतर भावकीतील किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील अनेक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी 14 जणांसह 5 ते 6 अनोळखी इसमांविरुद्ध मारहाण व धमकी देऊन जीव घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिरूर पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तात्या भाऊसो कोळपे (वय 30, रा.कोळपेवस्ती -मांडवगण फराटा,ता.शिरूर, जि.पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, ही घटना बुधवारी (ता.8) रात्री साडेआठच्या सुमारास गणेश लॉन्स जवळ घडली.

कोळपेवस्ती येथील देवाच्या मंदिरात धनगर समाजाचा वार्षिक देवकार्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमादरम्यान जवळच्या भावकीतील दादा कोळपे आणि शहाजी कोळपे यांच्यात जेवणावरून किरकोळ वाद झाला. त्यानंतर तो वाद मिरवण्यात आला. मात्र,रात्री घरी परतल्यानंतर तोच वाद पुन्हा पेटला.
रात्री साडेआठच्या सुमारास दादा भैरू कोळपे, मनोज भैरू कोळपे, शहाजी कारभारी कोळपे, अनिल शहाजी कोळपे यांच्यासह 13 ते 14 जणांनी तात्या कोळपे यांच्या घरासमोर येऊन, “तू देवाच्या कार्यक्रमात आमच्याशी वाद का घातलास? तुला जास्त माज आला आहे का?” असे म्हणत दादा कोळपे यांनी कोयत्याने तात्या कोळपे यांच्या डोक्यावर वार केला.
यावेळी तात्या कोळपे यांना वाचविण्यास परसराम कोळपे धावले असता,त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. दरम्यान, गंगाराम कोळपे, साळुबाई कोळपे व इतर नातेवाईक आवाज ऐकून बाहेर आले, तेव्हा मनोज कोळपे याने तलवारीसदृश हत्याराने गंगाराम कोळपे यांच्या डोक्यावर वार केला. शहाजी कोळपे यांनी धुळा कोळपे यांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांचा हात फ्रॅक्चर केला. तसेच महिलांनाही दगड व हातांनी मारहाण केली.
जखमींना तत्काळ वरदविनायक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारासाठी जात असताना भिवा कोळपे यांच्यावर पुन्हा पांढऱ्या कारमधून पाठलाग करून सोन्या उर्फ तुशार खैरे (रा.शिरसगाव काटा, ता.शिरूर,जि.पुणे) याने चाकूने हल्ला केला.इतकेच नव्हे, तर आरोपींनी पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन मनिषा कोळपे यांना पोटात लाथ मारून दुखापत केली.
त्यामुळे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दादा भैरू कोळपे, मनोज भैरू कोळपे, भैरू कारभारी कोळपे, शहाजी कारभारी कोळपे, अनिल शहाजी कोळपे, बाबुराव विठ्ठल कोळपे, धुळा विठ्ठल कोळपे, सिद्धेश्वर शिवाजी कोळपे, शिवाजी कारभारी कोळपे, धुळा बाबू थोरात, भिवा बाबू थोरात, सोन्या उर्फ तुषार खैरे व दोन महिलांसह इतर 5 ते 6 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास शिरूर पोलिस करीत आहेत.







