पुणे : राज्यासह पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोयता गँगची दहशत संपत नसतानाच, कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या कोथरुडमध्ये हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार करून गंभीर जखमी केले. या सर्व घटना ताज्या असतानाच, आता औंध भागात आर्थिक वादातून पार्टनरवर गोळीबार करत स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आकाश जाधव असे या गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तर अनिल ढमाले असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. औंधमधील ज्युपिटर चौकात हा प्रकार घडला. याच चौकात आकाश जाधवचे ज्वेलरी शॉप होते. हे शॉप त्याने अनिल ढमालेला चालवण्यासाठी दिले होते. मात्र, दोघांमधे गेल्या काही दिवसांपासून पैशाच्या व्यवहारावरुन वाद सुरु होते.
दरम्यान, शनिवारी (ता.10) आकाशने अनिल ढमालेला दुकानात बोलावून घेतले. त्यानंतर दोघेही एकाच दुचाकीवरून बँकेत जाण्यासाठी निघाले. यावेळी दुचाकीच्या मागे बसलेल्या अनिल ढमालेने दुचाकी चालवत असलेल्या आकाशवर मागून गोळी झाडली. गोळीबार केल्यानंतर अनिल ढमालेने पळ काढला. त्यानंतर तो एका रिक्षात जाऊन बसला. रिक्षात बसल्यानंतर अनिलने रिक्षाचालकाला पुणे स्टेशनच्या दिशेने रिक्षा नेण्यास सांगितले. रिक्षातून थोडं अंतर पुढे गेल्यानंतर रिक्षाच्या मागील सीटवर बसलेल्या अनिल ढमालेनं स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.