भिगवण: कुसेगाव (ता.दौंड) येथील श्री भानोबा देवाच्या यात्रेतील देव दानव युद्धाचा थरार पाहून घरी परतणाऱ्या दोघांचा अपघात झाला. हे दोघे पुणे-सोलापूर महामार्गावरून दुचाकीने जात होते. रावणगाव (ता.दौंड) ग्रामपंचायत हद्दीत अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये भिगवण (ता. इंदापूर) येथील एका नामवंत टेलरचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी (ता.२७) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला.
दत्तात्रय महादेव चव्हाण (वय 65, रा. डिकसळ, ता. इंदापुर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या टेलरचे नाव आहे. तर इंद्रभान रंगनाथ गोसावी (रा. भिगवण, ता. इंदापुर, जि. पुणे) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारत दत्तात्रय चव्हाण (वय 30, रा. डिकसळ, ता. इंदापुर, जि. पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत चव्हाण यांचे पाहुणे पाटस येथे राहतात. पाहुण्यांनी कुसेगावची यात्रा पाहण्यासाठी बोलाविले होते. तेव्हा भारतचे वडील दत्तात्रय चव्हाण, आई सविता, पत्नी गौरी, भाची रिया व नातेवाईक इंद्रभान गोसावी हे सर्वजण गेले होते. यात्रेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर भारतची आई सविता, पत्नी गौरी, भाची रिया हे बसमधून भिगवणला गेले. तर वडील दत्तात्रय चव्हाण व इंद्रभान हे दुचाकीवर घरी चालले होते. दुचाकीवरून घरी जात असताना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रावणगाव पोलीस चौकीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक दिली.
दरम्यान, रावणगाव येथील एका व्यक्तीने भारतला फोनद्वारे या अपघाताची माहिती दिली. या अपघाताची माहिती मिळताच भारत व त्याचा मित्र त्वरित घटनास्थळी गेले. तेव्हा वडील दत्तात्रय हे निचपित पडले होते. तर इंद्रभान हे गंभीर जखमी झाले होते. दोन्ही जखमींना भिगवण आयसीयू हॉस्पीटलमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी दत्तात्रय चव्हाण यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर इंद्रभान गोसावी हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भिगवण व डिकसळ गावावर शोककळा
भिगवण येथे मागील 30 वर्षांपासून दत्तात्रय चव्हाण हे टेलरिंगचा व्यवसाय करत होते. चव्हाण हे अत्यंत शांत, संयमी व एक कुशल कारागीर म्हणून प्रसिद्ध होते. चव्हाण यांच्या अपघाती मृत्युमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. तर एक चांगला व्यक्ती हरपल्याने भिगवण व डिकसळ परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून जावई व नातवंडे असा परिवार आहे.