Loni Kalbhor लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या औषध विक्रेत्याने राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात सोमवारी (ता.२७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
रामदास शेंडगे (वय ३२, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या औषध विक्रेत्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामदास शेंडगे हे माळीमळा परिसरातील सुयश हॉस्पिटलजवळ मेडिकल चालवतात. रामदास यांच्या पत्नीला सोमवारी (ता.२७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रामदास हे घरातील खोलीत आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस हवालदार केतन धेंडे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रामदास शेंडगे यांचा मृतदेह खाली घेतला. पोलिसांनी शेंडगे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
दरम्यान, रामदास शेंडगे यांनी आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.