पुणे: पहाटेच्या वेळी रिक्षामधून रेकी करीत मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक केली. आरोपीकडून तीन मोबाईल, रिक्षा असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विजय ऊर्फ खंड्या खंडू सरोदे (वय १९, रा. ढोरे पेट्रोलपंपासमोर, हरपळे वस्ती, फुरसुंगी) असे अटक केलेल्याचे नाव असून, एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.
ससाणेनगर-हडपसर रस्त्यावर रिक्षात बसलेल्याने मोबाईल चोरून नेल्याची तक्रार हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपींचा तपास करत ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून ५० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली तीन लाख रुपयांची रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी विजय ऊर्फ खंड्या खंडू सरोदे याच्यावर हडपसर, लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये एक, तर फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी, सत्यवान गेंड, अविनाश गोसावी, दीपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, अजिता मदने, अभिजित राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महावीर लोंढे यांच्या पथकाने कामगिरी केली. पुढील तपास पोलीस अंमलदार दीपक कांबळे करत आहेत.