दौंड, (पुणे) : बारामती-फलटण रस्त्यावर वासुंदे (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन ऑईल पंपासमोर महाराष्ट्र बँकेच्या वसुली अधिकाऱ्याचा धारदार शस्त्राने खून करणाऱ्या आरोपीला दौंड व स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
दिपक रामदास लोंढे (वय-३७, रा. वासुंदे ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांमुळे मला त्रास होतो. जाणून-बुजून माझ्या अंगावर वाहने घालतात. याचा मला त्रास होतो. या कारणावरून रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारासोबत वाद घालून हातातील धारदार सुरा मारून खून केल्याची माहिती आरोपीने तपासादरम्यान पोलिसांना दिली आहे.
दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रवीण मळेकर (वय-५८) हे बँकेत रिकव्हरीचे काम करत होते. ते शुक्रवारी (१ मार्च) रात्री आपल्या मोटारसायकलवरून बारामतीहून कुरकुंभ येथे जात असताना वासुंदे ता. दौंडच्या हद्दीत एका अज्ञाताने धारदार हत्याराने भोसकून मळेकर यांचा खून केल्याची फिर्याद त्यांचा मुलगा ऋषिकेश मळेकर यांनी दौंड पोलिसात दिली होती.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज व डॉग स्कॉड बोलावून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. तसेच काही तासांपूर्वीही आरोपीने गाडीवर दगड मारले होते. मागील एका गुन्ह्यात महिलेला सदर आरोपीने धारदार हत्याराचा धमकी देण्यासाठी वापर केला होता. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्यची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आरोपी दीपक लोंढे याला ताब्यात घेतले.
दरम्यान, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ‘रस्त्याने जाणाऱ्या वाहणांमुळे मला त्रास होतो. जाणून-बुजून माझ्या अंगावर वाहने घालतात. याचा त्रास होतो, या कारणावरून रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी चालकाचा खून केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, अरविंद गटकुळ, तुकाराम राठोड, सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे, शंकर वाघमारे, सुभाष राऊत, पांडुरंग थोरात, सागर म्हेत्रे, नितीन बोराडे, रवी काळे, अमीर शेख, संजय नगरे, अमोल देवकाते, शरद वारे, योगेश गोलांडे, महेश भोसले, किरण पांढरे, पोलीस जवान असिफ शेख, मंगेश ठिगळे, विजय कांचन, धिरज जाधव आदींनी केली आहे.