शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गावरून कन्हैय्या ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत पीडित महिलेने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी निलेश रमेश भराटे (वय २८ रा. भूराटवाडी पोस्ट पांगरी मारुती ता. पाटोदा जि. बीड) याला अटक केली.
शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गावरून कन्हैय्या ट्रॅव्हल्सच्या बसमधून काही प्रवासी प्रवास करत असताना पहाटेच्या सुमारास महिलेच्या पाठीमागे बसलेला इसम महिलेशी अश्लील वर्तन करुन मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करु लागला. यावेळी महिलेने आरडाओरडा केल्याने अन्य प्रवासी जागे झाले. दरम्यान काही वेळापूर्वी सदर इसमाने महिलेच्या तेरा वर्षीय मुलीसोबत देखील असेच कृत्य केल्याचे मुलीने सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहेत.