उरुळी कांचन, (पुणे) : शेताजवळुन नदी व कालवे दुथडी भरुन वाहत असतानाही पाण्याअभावी पिके जळुन चालल्याचे चित्र दिसले, तर तुम्ही काय म्हणाल, हे खोटे आहे. पण, दुर्देवाने हे खरे आहे. हा प्रकार मागील दोन महिन्यांपासून बारमाही बागायती क्षेत्र म्हटल्या जाणाऱ्या पुर्व हवेलीत वारंवार दिसुन येत आहे. शेतीला पाणी पुववठा करणाऱ्या पंपाना वीज पुरवठा न होणे हे यामागील कारण आहे. परंतु, वीज पुरवठा न होण्याला कारणीभूत वीज मंडळ नाही तर विद्युत रोहित्रांमधील कॉपरच्या तारा चोरणारे चोरटे आहेत.
उरुळी कांचनसह पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ, नायगाव, वाडेबोल्हाई परिसरात पुन्हा एकदा विद्युत रोहित्र चोरट्यांनी धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली आहे. चोरट्यांनी मंगळवारी (ता. २१) एकाच दिवशी तब्बल चार रोहीत्रे फोडुन तांब्याच्या तारा चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले.
उरुळी कांचन जवळील कोरेगाव मुळ ग्रामपंचायत हद्दीतील वाळेकर, तांबे व भरीतकर वस्ती येथील प्रत्येकी एक असे तीन व नायगाव (ता. हवेली) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट परिसरातील एक रोहित्र चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शेतजवळून नवीन उजवा मुळा-मुठा कालवा व जुना मुठा कालवा हे दोन्ही कालवे दुथडी भरुन वाहत असतानाही विद्युत पंपासाठी वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याअभावी जळून चालल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून पुर्व हवेलीत दिसुन येत आहे. चोरट्यांनी लोकवस्तीपासुन दुर असणाऱ्या विद्युत रोहित्रांना टारगेट केले असुन, यामुळे महावितरण कंपनीचे कर्मचारी हतबल झाले आहेत. तर दुसरीकडे मुबलक प्रमाणात पाणी असतानाही चोरट्यांच्या करामतीमुळे पिके जळून जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहत आहे.
वीज वितरण कंपनीच्या ऊरुळी कांचन विभागीय कार्यालयाच्या हद्दीत मागील दोन महिन्यांच्या काळात तब्बल अकरा रोहित्रे फोडुन चोरट्यांनी कॉपरच्या तारा चोरून नेल्या आहेत. यामध्ये वीज कंपनीची चूक नसतानाही शेतकरी विजेपासून वंचित राहत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्ह वाढल्याने पिकांसाठी पाण्याची गरजही वाढली आहे. उन्हापासुन पिक वाचवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. मात्र, विद्युत मोटारींसाठी वीज पुरवठा होत नसल्याने, शेतकरीही हतबल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना कोरेगाव मूळ येथील सहायक अभियंता रमेश वायकर म्हणाले, मागील दोन महिन्यांपासून रोहित्रांमधील तांब्याच्या तारांची चोरी वारंवार होत आहे. तारांच्या चोरीमुळे महावितरणाचे मोठे नुकसान झाले आहे. एका रोहीत्रामागे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पूर्व हवेलीतील हजारो शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. चोरटे लोकवस्तीपासुन दुर व एकांगी असणाऱ्या रोहित्रांचा रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडीत करुन, त्यावर डल्ला मारत असल्याचे दिसून येत आहे. या चोऱ्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी थोडीशी सावधानता बाळगण्याची गरज आहे.
उरुळी कांचन येथील उपकार्यकारी अभियंता धम्मपाल पंडित म्हणाले, “रोहीत्रांमधील कॉपरच्या तारांची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या वीज पंपाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. रोहित्र चोरीची माहिती मिळताच, लवकरात लवकर रोहित्र बसवून लवकरच वीजपुरवठा पूर्वरत करण्याचा प्रयत्न वीज मंडळाकडुन केला जात आहे. तसेच नवीन रोहित्र बसविताना दोन्ही बाजूंनी त्याला वेल्डिंग केली जात आहे. तरीही चोरटे गस कटरच्या सहाय्याने चोरी करीत आहेत. चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी महावितरण कंपनीकडून लवकरच उपाययोजना राबवणार आहोत.