पुणे: राज्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारात अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या जमीन मोजणीच्या निकषांमध्ये शासनाने बदल केले आहेत. जमीन मोजणीचे प्रकार कमी करतानाच नवीन प्रकारांनुसार शुल्काच्या रकमेतही बदल करण्यात आला आहे.
याआधी साधी, तातडीची, अतितातडीची आणि अति- अतितातडीची मोजणी अशा चार प्रकारांनी जमीन मोजणी केली जात असे आणि तसे शुल्कही आकारले जाई. या प्रकारांनुसार ठरावीक कालावधीत जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. आता नवीन सुधारणेनुसार, नियमित मोजणी आणि द्रुतगती मोजणी अशा दोन प्रकारांनी जमीन मोजणी करण्यात येईल आणि त्यानुसार शुल्क आकारले जाणार आहे. पूर्वी जमीन मोजणीसाठी कमीत कमी दर १ हजार रुपये होता, तो आता २ हजार करण्यात आला आहे. म्हणजेच नियमित मोजणीसाठी २ हजार आणि द्रुतगती मोजणीसाठी ८ हजार रुपये आकारले जाणार आहेत. २०१२ नंतर प्रथमच जमीन मोजणी शुल्कात वाढ करण्यात आली आहे.
भूमी अभिलेख विभागाचे परिपत्रक
भूमी अभिलेख विभागाच्या परिपत्रकानुसार, प्रशासकीय खर्चात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ लक्षात घेता मोजणी फी दरामध्ये वाढ करणे आवश्यक झाले असून, त्यानुसार प्रचलित दर आणि कालावधी व प्रकार यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी जमीन मोजणी पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने केली जायची. आता ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने केली जात असल्यामुळे तंत्रज्ञानाचाही खर्च वाढल्याचे भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नवीन निकष कधीपासून लागू होणार?
आचारसंहितेमुळे महिनाभर स्थगित असलेले हे बदल याच महिन्यापासून अंमलात आले आहेत. मात्र, १ नोव्हेंबर २०२४ पूर्वी मोजणी फी सहित जे अर्ज दाखल झालेत, त्यांना नवीन दर लागू राहणार नाहीत. विहित कालावधीत मोजणी पूर्ण न झाल्यास संबंधित अर्जदार राईट टू सर्व्हिस या कायद्याद्वारे दाद मागू शकणार आहेत.
नवीन प्रकार आणि शुल्क
नियमित मोजणी: आधी या मोजणीला ‘साधी मोजणी’ म्हटले जायचे, ती १८० दिवसांत पूर्ण करावी लागायची आणि त्यासाठी २ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत १ हजार रुपये फी होती. आता या मोजणीला ‘नियमित मोजणी’ म्हटले जाईल. ती ९० दिवसांत पूर्ण करण्याचे बंधन असेल, नियमित मोजणीसाठी २ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत २ हजार रुपये फी असेल आणि २ हेक्टरच्या पुढे प्रती २ हेक्टरसाठी १ हजार रुपये फी आकारली जाईल.
द्रुतगती मोजणी: पूर्वी १५ दिवसांत अति-अतितातडीची मोजणी करून दिली जायची आणि त्यासाठी १२ हजार रुपये फी होती. नवीन द्रुतगती मोजणी प्रकारात ३० दिवसांच्या आत मोजणी पूर्ण करण्याचे बंधन आहे. द्रुतगती मोजणीसाठी २ हेक्टर मर्यादेपर्यंत ८ हजार रुपये फी असेल, २ हेक्टरच्या पुढे प्रती २ हेक्टरसाठी ४ हजार रुपये फी आकारली जाईल.