लोणी काळभोर, ता.१९ : पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी येथे ह. भ. प. कै. प्रभाकर मल्हार कुंटे यांच्या स्मरणार्थ जय मल्हार केसरी 2024 च्या भव्य खुल्या मैदानी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पै. आदित्य राजू काळभोर याने सोलापुराचा पै. सोहम पठारे याला चीतपट करून आस्मान दाखविले आणि ‘जय मल्हार केसरी’चा किताब आपल्या नावावर केला आहे.
आदित्यचे वडील राजू काळभोर हे क्रीडा शिक्षक असून, ते सध्या तासगाव जिल्हा सांगली येथील पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत आहेत. आदित्यची आई रूपाली या गृहिणी आहेत. तर त्याची छोटी बहिण ज्ञानेश्वरी ही लोणी काळभोर येथील एका नामांकित शाळेत अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आदित्यचे आजोबा साधना विद्यालयाचे माजी प्राचार्य कै. गुलाब काळभोर व त्याचे चुलते कै. संजय काळभोर यांचे असे स्वप्न होते की, आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य पैलवान असावा. त्याने कुस्त्या करून नावलौकिक मिळवावा. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजू काळभोर यांनी आदित्यला कुस्तीच्या मैदानात उतरविण्याचे ठरविले आणि त्याला प्रोत्साहन दिले.
आदित्यने प्राथमिक शिक्षण लोणी काळभोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण केले. तर माध्यमिक शिक्षण पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधून घेतले. तर आता आदित्य टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे पदवीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. आदित्य सहावीत शिक्षण घेत असल्यापासून कुस्तीचे धडे शिकू लागला.
आदित्य हा सर्वात प्रथम लोणी काळभोर गावाच्या परिसरातील यात्रेला जाऊन रेवड्यांवर छोट्या-मोठ्या कुस्त्या करू लागला. या कुस्त्यांमध्ये कधी तो जिंकला तर कधी त्याला पराभव पत्करावा लागला. मात्र, त्या कुस्त्या खेळताना त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. येथूनच त्याचा कुस्ती क्षेत्रातील डाव-प्रतिडावाचा श्रीगणेशा सुरु झाला.
आदित्यने जिंकली चांदीची गदा
आदित्यने या अगोदर कुस्तीगीर परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. तसेच तो राज्य व देश पातळीवरील अनेक कुस्त्या खेळला आहे. आकुर्डी येथील जय मल्हार केसरीचा किताब नावावर करून आदित्यने चांदीची गदा व रोख रक्कम असे बक्षीस मिळविले आहे.
सर्वत्र होतंय कौतुक
आदित्यला नर्सिंग रेसलिंग अकॅडमीचे प्रशिक्षक किशोर नखाते व वस्ताद अजय लांडगे यांचे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले. आदित्यने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे शासकीय, सामाजिक, राजकीय शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
‘महाराष्ट्र केसरी’चा बहुमान मिळवण्यासाठी प्रयत्न करणार
लोणी काळभोरला महाराष्ट्र केसरीची पहिली गदा २००३ साली पै. राहुल काळभोर यांनी आणली आहे. महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, मुंबई महापौर केसरी अजय लांडगे व वस्ताद अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून पुन्हा एकदा ‘महाराष्ट्र केसरी’चा बहुमान मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– आदित्य काळभोर, ‘जय मल्हार केसरी’