उरुळी कांचन : पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत मोटार सायकलच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या 571 दुचाकी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही गुंठामंत्र्यांच्या मुलांवर व टवाळखोर ‘बुलेट राजां’च्या उनाडखोरीला चाप का लावला जात नाही असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.
मागील दोन दिवसात विमानतळ, हांडेवाडी, कोरेगाव पार्क, डेक्कन, भारती विदयापीठ तसेच हडपसर वाहतूक विभागात ही कारवाई करण्यात आली आहे. मग लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलीस ठाणे याला अपवाद का? असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारू लागले आहेत. तसेच परिसरात अजूनही बरेच तरुण एक क्रेझ म्हणून अशा फटाके फोडणाऱ्या बुलेट सुसाट वेगाने चालवित असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
सध्या बुलेटची तरुणाईत मोठी क्रेझ आहे. बुलेट म्हटले की, नजरेसमोर येतो तो फर्रर्रर्र फटाक् असा आवाज अन् दचकलेले, घाबरलेले चिमुकल्यांसह वृद्धांचे चेहरे. अनेक दिवसांपासून असे फटाके वाजविणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर, शाळेच्या परिसरात सर्वात पुढे वेगात जाऊन फटाका वाजवणे, गल्ली बोळातून भरधाव वेगात जाताना मध्येच फटाका वाजवणे यामुळे अनेक दुचाकीस्वार गडबडतात. तर बहुतांश दुचाकीवरील वृद्ध, बालके घाबरुन जात असल्याचे चित्र सध्या परिसरात आहे.
कर्णकर्कश आवाजामुळे बहिरेपणा, चिडचिडेपणा वाढत आहे. ही वाहने मोठ्या घरातील व्यक्तींची असल्याने यावर पोलीस, आरटीओ विभाग दुर्लक्ष करत असल्याची तक्रार आहे. एकीकडे काही शहरात फटफट आवाज करणाऱ्या बुलेटचे सायलेन्सर काढून त्यावर वाहतूक पोलिसांकडून बुलडोजर फिरवल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र, दोंडाईचात अशी कुठलीच कारवाई होत नसल्याचे दिसत आहे.
दुचाकीमध्ये केला जातो अनावश्यक बदल..
सध्या शहर परिसरात अशा काही मोटारसायकली आहेत की त्या रस्त्यावरून जाताना त्याचा आवाज इतर मोटारसायकलच्या तुलनेत खूपच मोठा येतो. या मोटारसायकलींच्या सायलेंसरमध्ये अनेक तरूण बदल करत आहेत. त्यातून कर्कश व धडकी भरणारा आवाज निर्माण केला जातो. त्यांच्या आवाजाने रस्त्यावरील इतर वाहन चालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचे धोके निर्माण होऊ लागलेत.
या ठिकाणी प्रमाण जास्त..
पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाका चौक, पुणे-सोलापूर महामार्ग, स्टेशन चौक, लोणी काळभोर गाव, उरुळी कांचन येथील आश्रम रोड, महात्मा गांधी चौक परिसरात रस्त्यावरून अगदी भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काही तरूण दुचाकीवरून धूम स्टाईलमध्ये फिरतात.
पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत फेरबदल केलेल्या सायलेन्सच्या मोटरसायकल चालवताना वाहनचालक आढळून आल्यास त्याची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेच्या व्हॉटसअॅप क्रमांक 8087240400 वर वाहन क्रमांक व लोकेशनसह कळवावी. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
याबाबत बोलताना लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे म्हणाले, लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या हद्दीत मागील दोन दिवसात १४ बुलेटचालकांकडून प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून पुढे हि कारवाई सुरूच राहणार आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले, “बुलेट राजांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार उरुळी कांचन व परिसरात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.