लोणी काळभोर, (पुणे) : पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाची वेळ ही सकाळी आठ ते रात्री आठ अशी बारा तासांची आहे. एकूण कर्मचाऱ्यांपैकी एक टक्का अपवाद वगळता वाहतूक शाखेतील 99 टक्के वाहतूक कर्मचारी ठरलेल्या वेळेत व वरिष्ठांनी नेमून दिलेल्या जागेवर वाहतूक नियमन करत असतात. मात्र, शहर पोलिसांच्या अखत्यारीत असलेला लोणी काळभोर वाहतूक पोलिस विभाग याला अपवाद ठरत आहे. काही ठराविक वाहतूक पोलिस कर्मचारी सोडले तर, लोणी काळभोर पोलिसांचा वाहतूक विभाग म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा…’ असा आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी परिसरात वाहतूक विभागाकडून बेशिस्त वाहनचालक व वाहनांवर नियम मोडल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली जात आहे. महामार्गाची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. वाहतूक कोंडीने नागरिक, कामगार त्रस्त झालेले आहेत. त्यात लोणी काळभोर वाहतूक विभागाकडून वाहनांचे मोबाईलवर फोटो काढून दंडात्मक कारवाई केली जाते. या कारवाईमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. काही अधिकारी, पोलीस कर्मचारी त्यांचे टार्गेट म्हणून त्रास देत असल्याचा आरोप या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाट्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे त्या ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलिसांना दिसून येते. पुणे शहर वाहतूक विभागातील काही महिला कर्मचारी थेऊर फाट्यावर फक्त पावत्या फाडण्यासाठी थांबतात. पावत्या फाडून झाल्यानंतर थेऊर फाट्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये जाऊन बसतात. वाहतूक कोंडी झाल्याची पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना डोळ्याने दिसत असतानाही, सर्वजण त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. कर्तव्यावर असणारे पोलिस कर्मचारी हॉटेलमध्ये बसून मोबाईलवर दंग असल्याचे चित्र नित्याचेच झाले आहे. मात्र, वाहतूक पोलीस हॉटेलमधून बाहेर येण्याचे काही नाव काढत नाहीत.
वाहतूक शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना टार्गेट दिले आहे. ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी हे कर्मचारी फक्त वसुलीचे काम करतात. त्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन बसतात. संध्याकाळी सेल्फी काढून त्या ठिकाणावर कोणतीही वाहतूक कोंडी नसल्याचे दाखवतात आणि कलटी मारतात.
वाहतूक शाखेतील एक वाहतूक कर्मचारी वसुली करण्यात दंग असून लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी येथील ‘बड्या’ व्यक्तींची नावे घेऊन त्यांचा पाहुणा असल्याचे सांगत आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे वाहतूक नियमनासाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांपैकी बहुसंख्य वाहतूक पोलिस कर्मचारी ‘वेगळ्याच’ कामात गुंतले असल्याचा आरोप यावेळी या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी केला आहे.
;
लोणी स्टेशन, एमआयटी चौक, थेऊर फाट्यावर सकाळी व दुपारी तीनच्या दरम्यान शाळेच्या मुलांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. मात्र, या ठिकाणचे पोलिस कर्मचारी निवांत म्हणजे साडे नऊ-दहानंतर आपल्या वेळेनुसार हजर होत असल्याची रोजचीच ओरड आहे. तर सायंकाळी सहानंतर पुणे-सोलापुर महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढते. या कालावधीतच वाहतूक पोलिसांनी चौकात थांबून नियमन करणे अपेक्षित असताना सायंकाळी सहानंतर पोलिस दिसतच नाहीत. त्यामुळे पोलिस कर्मचारी वाहतूक नियमन करतात की नाही, याचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोलिसांनी तातडीने कारवाई करावी
उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकात अपवाद वगळता बाराही महिने वाहतूक कोंडी आढळून येते. या चौकात रस्त्यातच अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षा, मोठी वाहने, खासगी वाहने थांबतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा सेवारस्ता हा टपरी चालक व हातगाड्यांनी व्यापला आहे. त्यामुळे पायी चालणेही जीवावर बेतू शकते. मात्र, पोलीस कारवाई करत नाही. तसेच लोकप्रतिनिधी लक्ष घालत नसल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
याबाबत बोलताना कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तात्या तुपे म्हणाले, “थेऊर फाट्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. विनाकारण कुंजीरवाडी व परिसरातील नागरिकांवर पावत्या फाडण्याचे काम सुरु केले आहे. पोलीस वाहतूक कोंडी दूर करण्याची सोडून या ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्ये बसून राहतात. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहने लागली आहेत. मात्र, पोलीस कोणतीही कारवाई करीत नाहीत. ते फक्त पावत्या फाडण्यात दंग आहेत.”