Loni Kalbhor : लोणी काळभोर : वीज गेली की, अनेकजण महावितरणच्या नावाने खडे फोडायला सुरवात करतात. याच महावितरणचे कर्मचारी वेळ आली की भर पावसात, जिवाची बाजी लावत रात्री-अपरात्रीही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत असतात. याची कल्पना टीकाकारांना नसते. याचा प्रत्यय लोणी काळभोरकरांना नुकताच आला. वीज गेल्यावर पाहणी केल्यानंतर शिवशक्ती व कदमवाकवस्ती येथील इस्ट हेवन येथील वीजवाहिनीत बिघाड झाल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शोधून काढले. मुसळधार पावसात मंगळवारी (ता. २६) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तब्बल १३ मीटर उंचीच्या विद्युत खांबावर चढून विद्युतपुरवठा सुरळीत केला. या कामगिरीमुळे लोणी काळभोर येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मध्यरात्री विद्युत खांबावर चढून पुरवठा केला सुरळीत
लोणी काळभोर येथे मंगळवारी सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरवात झाली. पावसामुळे वीजेचा लपंडाव सुरू होता. मात्र, मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोरचा विद्युत पुरवठा अचानक बंद झाला. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्या विद्युतवाहिनीत बिघाड झाला, याचा शोध घेण्यास सुरवात केली. (Loni Kalbhor ) कर्मचाऱ्यांनी सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वीजवाहिनीत बिघाड झाल्याचे शोधून काढले.
लोणी काळभोर येथील शिवशक्ती व कदमवाकवस्ती येथील इस्ट हेवन या ठिकाणी असलेल्या वीजवाहिनीत बिघाड झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मुसळधार पावसाचीही तमा न बाळगता मंगळवारी (ता. २६) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तब्बल १३ मीटर उंचीच्या विद्युत खांबावर चढून, विद्युत पुरवठा सुरळीत केला. यामुळे ऐन गणेशोत्सवात अंधारात असलेले गाव पुन्हा वीजेच्या झगमगाटाने उजळले. (Loni Kalbhor ) या उत्तम कामगिरीमुळे लोणी काळभोर येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लोणी काळभोर येथील शिवशक्ती व कदमवाकवस्ती येथील इस्ट हेवन या तब्बल १३ मीटर उंचीचे विद्युत खांब आहेत. वीजपुरवठा सुरू करून ग्राहकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी विद्युत तंत्रज्ञ पांडुरंग खरात, दादा चौधरी, अक्षय पाटील व विशाल मोरे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास विद्युत पोलावर चढले. तरीही पावसाचा जोर कमी झाला नव्हता. या पावसात विद्युत कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता, चीनी मातीच्या पीन बदलून लोणी काळभोर गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत केला. (Loni Kalbhor ) यासाठी लोणी काळभोर शाखेचे कनिष्ठ अभियंता रामप्रसाद नरवडे, वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल शेलार, श्रीकृष्ण लाड, दादा आगळे यांचे सहकार्य मिळाले.
जीव धोक्यात घालून काम
महावितरणचे कर्मचारी म्हणजे हातात टेस्टर, पकड, वायर असे चित्र सहसा पाहायला मिळते. वीज गेली की, त्यांच्या नावाने सगळेच बोटे मोडतात. (Loni Kalbhor ) परंतु लोणी काळभोर येथील महावितरण कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. कारण त्यांनी मुसळधार पाऊस व रात्रीच्या अंधारात जीव धोक्यात घालून वीज पुरवठा सुरळीत केला.