लोणी काळभोर. (पुणे) : वडकी ग्रामपंचायत हद्दीत एक वर्षापूर्वी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी बांधण्यात आलेला स्टेज कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका वर्षांनी बैलगाडा आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. एवढ्या उशिराने गुन्हा दाखल झाल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा कारभार म्हणजे वरातीमागून घोडे जाण्यासारखाच काहीसा आहे.
संदीप बबन मोडक (वय-41 रा. वडकी ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आयोजकाचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक किशोर हणमंत पवार (वय-41) यांनी शुक्रवारी (19 जुलै) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या दुर्घटनेत बाळासाहेब काशीनाथ कोळी (वय-46 रा. निनाम पाडळी, जि. सातारा) आणि अंकुश साधु चोर (वय-65) यांचा मृत्यू झाला होता.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त वडकी व लोणी काळभोर हद्दीतील रामदरा परिसरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीसाठी स्टेज बांधला होता. 4 जून रोजी सायंकाळी लोणी काळभोर परिसरात मुसळधार पाऊस सुरु झाला. जोरदार वारे वाहत असल्याने बाळासाहेब कोळी आणि अंकुश चोर यांच्यासह इतर काहीजण आडोशाला स्टेजजवळ थांबले होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे स्टेज आडोशाला थांबलेल्या कोळी आणि चोर यांच्या अंगावर कोसळला. स्टेज कोसळल्यामुळे गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र कोळी यांचा उपचारापूर्वी, तर चोर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, बैलगाडा शर्यतीचे आयोजक संदिप मोडक यांनी शर्यतीचे आयोजन करताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने लोखंडी रॅक व स्टेज कोळी आणि चोर यांच्या अंगावर कोसळल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने मोडक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.