पुणे : पुण्यातील बाणेर-पाषाण रोडवर एका डिजिटल कंटेन्ट क्रिएटर महिलेला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कार चालकाने या महिलेचा दोन किमीपर्यंत पाठलाग करुन तिला मारहाण केली आहे. जेरलिन डिसिल्वा असं या महिलेचं नाव आहे. या घटनेत तिच्या नाकातून मोठ्या प्रमाणावर रक्त स्त्राव होत असल्याचं तिच्या एका व्हिडिओमधून दिसत आहे. या घटनेची माहिती या महिलेने एका व्हिडिओतून दिली आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
जेरलिन डिसिल्वा ही महिला दुचाकीवरून बाणेर-पाषाण लिंक रोडवरुन दोन लहान मुलांना घेऊन जात होती. त्यावेळी एका कार चालकानं तिला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, यावेळी जेरलिन यांना तिची दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. यावेळी आरोपी ड्रायव्हरने आपली कार थांबवली आणि खाली उतरुन जेरलिन यांच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा मारला. या मारहाणीत त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. जेरलिनसोबत असलेल्या दोन लहान मुलांसमोर या अज्ञात वाहनचालकाने तिला मारहाण केली.
या घटनेनंतर जेरलिन यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी आपल्याबाबत घडलेला प्रकार सांगितला. त्या म्हणाल्या, मला मारहाण होण्यापूर्वी मारहाण करणारा कार चालक माझ्या वाहनाचा सुमारे 2 किलोमीटरपासून पाठलाग करत होता. या घटनेनंतर जखमी झालेल्या जेरिनला एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
View this post on Instagram