लोणी काळभोर: लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती) परिसरात खुलेआम सुरु असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (ता.11) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी 1 हजार 765 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून दोघांवर जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दत्तात्रय नवनाथ मोहोळकर (वय 51 रा. म्हातोबा आळंदी ता. हवेली जि. पुणे) व तात्याराम महादेव ससाणे (वय 51 , रा. माळीमळा, लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नरजवळ खुलेआम मटका जुगार सुरु आहे, अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा दत्तात्रय मोहोळकर व तात्याराम ससाणे हे त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे मटका जुगार पैशांवर खेळत असताना मिळुन आले. पोलिसांनी या छाप्यात रोख रक्कमेसह 1765 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, सहाय्यक फौजदार कांबळे, पोलिस अंमलदार संदीप धुमाळ, सूरज कुंभार यांच्या पथकाने केली आहे.