लोणी काळभोर, (पुणे) : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तडीपार गुंडाची लोणी काळभोर पोलिसांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतून धिंड काढली. मंगळवारी (ता.६) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. ही कारवाई कुंजीरवाडी परिसरातील नागरिकांनी देखील पाहिली.
योगेश शांताराम लोंढे (वय ३२, रा. जुन्या कॅनलजवळ, माळवाडी, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे धिंड काढण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असून, त्याला लोणी काळभोर पोलिसांनी तडीपार केले होते. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार बाजीराव वीर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, आळंदी म्हातोबाची परिसरात एक व्यक्ती वडाच्या झाडाखाली हातात लोखंडी कोयता घेऊन थांबला आहे.
याबाबतची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार व अधिकारी सदर ठिकाणी पोहोचले. यावेळी पोलिसांनी तडीपार केलेला आरोपी योगेश लोंढे हा उजव्या हातात लोंखडी कोयता घेऊन थांबलेला दिसला. पोलिस आल्याची चाहूल लागताच त्या ठिकाणावरून तो पळून जात असताना पोलीस पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून पोलिसांनी कोयता ताब्यात घेतला. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे हे करत आहेत.
लोणी काळभोर पोलिसांनी काढली आरोपीची धिंड
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी आरोपी योगेश शांताराम लोंढे याची राहत असलेल्या ठिकाणावरून कुंजीरवाडी (ता. हवेली) गावातून धिंड काढली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदशनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस हवालदार सतिश सायकर, पोलीस अंमलदार योगेश पाटील, निखील पवार, प्रशांत सुतार, सागर कदम, बाजीराव वीर, चक्रधर शिरगीरे यांच्या पथकाने केली आहे.
View this post on Instagram