लोणी काळभोर : घरात झालेल्या किरकोळ कारणावरून एका महिलेने फिनेल पिऊन रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरातील रेजेंद्र पेट्रोल पंपाच्या पाठीमागे आज मंगळवारी (ता.4) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतीक्षा ढावरे (वय-35, रा. माळी मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा ढावरे यांचे सासु सासरे हे लोणी काळभोर येथील माळी मळा परिसरात राहतात. तर प्रतीक्षा ढावरे व तिचे पती पुण्यात राहतात. प्रतीक्षा ढावरे यांना दोन मुले आहेत. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाले होते. त्यामुळे प्रतीक्षा ढावरे यांचे पती आईवडिलांकडे लोणी काळभोर येथे रागाने निघून आले होते.
प्रतीक्षा ढावरे या नवऱ्याला विनवणी करून परत घरी नेण्यासाठी सोमवारी (ता.3) आल्या होत्या. दरम्यान, प्रतीक्षा ढावरे व त्यांच्या पतीमध्ये पुन्हा वाद झाला. या रागातून प्रतीक्षा ढावरे यांनी फिनेल पिले व रेल्वेखाली आत्महत्या करण्यासाठी निघून गेल्या.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल ईश्वर भगत व शिवाजी दरेकर हे तातडीने घटनास्थळी गेले. तेव्हा त्यांना प्रतीक्षा ढावरे या रेल्वेच्या रूळावर झोपलेल्या आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना रूळातून बाहेर काढून आत्महत्येपासून रोखले. आणि प्रतीक्षा ढावरे यांना पोलीस ठाण्यात आणले.
प्रतीक्षा ढावरे यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिचे पती व सासु-सासऱ्यांना बोलावून घेण्यात आले. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलीस हवालदार राजाराम फडतरे, महिला हवालदार होले यांनी प्रतीक्षा ढावरे यांना समुपदेशन केले.
थोड्या वेळानंतर प्रतीक्षा ढावरे यांनी फिनेल पिले असल्याने त्यांना उलट्याचा त्रास होऊ लागला. त्यानंतर प्रतीक्षा ढावरे यांना लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रतीक्षा यांच्यावर तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
लोणी काळभोर पोलिसांचे होतेय सर्वत्र कौतुक
या घटनेची माहिती मिळताच, समयसूचकता दाखवून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल ईश्वर भगत व शिवाजी दरेकर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा प्रतीक्षा ढावरे या जीव देण्यासाठी रेल्वेच्या रूळावर झोपल्या होत्या. या दोन्ही पोलिसांनी बराच वेळ विनवणी केल्यानंतर त्यांना रेल्वे रुळावरून उठविण्यास यश मिळविले. त्यांनी दाखविलेल्या कार्यतप्तरतेमुळे महिलेचा जीव वाचला असून महिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त झाली आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.