लोणी काळभोर, (पुणे) : मावशीबरोबर देवदर्शन करण्यासाठी आलेल्या मुलाची पीएमपीएमएल बसमध्ये चुकामूक झाली. त्यात ८ वर्षांचा मुलगा हरवला. पण नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेने कुटुंबियांना हा मुलगा परत मिळाला. वेदांत राजेंद्र धुमक (वय ८ रा. विश्रांतवाडी, पुणे) असे मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र धुमक हे कुटुंबीयांसोबत विश्रांतवाडी परिसरात राहत असून, त्यांना वेदांत हा एकुलता एक मुलगा आहे. बुधवारी वेदांत हा त्याच्या मावशी गीता कदम यांच्यासोबत शंकरमठ स्वारगेट या ठिकाणी देवदर्शनासाठी गेला होता. दर्शन घेऊन येताना पीएमपीएमएल बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने त्याची व मावशी गीता कदम यांची चुकामक झाली. त्यानुसार, वेदांत हा गर्दीमुळे स्वारगेट येथून लोणी काळभोर परिसरात आला. या मुलाला अमित अजित रणदिवे (रा. जिंती, ता. करमाळा, जिल्हा सोलापूर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात घेऊन आले.
पोलीस अंमलदार संतोष होले यांची कार्यतत्परता कामी..
यावेळी हा मुलगा पोलिसांना कोणतीही माहिती देत नव्हता. जोरजोरात रडतही होता. यावेळी पोलीस अंमलदार संतोष होले यांनी त्यांचे पोलिसी कौशल्य वापरून त्या मुलाला खाऊ दिला. तसेच त्याला शांत करण्यासाठी मोबाईलमधील गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला. तेव्हा मुलगा शांत झाला. दरम्यान, गेम खेळताना वेदांत याने मोबाईलवरून त्याच्या वडिलांचा फोन डायल केला. यावेळी होले यांनी ही सर्व माहिती वेदांतचे वडील राजेंद्र धुमक यांना फोनवरून दिली. त्यानंतर धुमक हे तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात हजर झाले व मुलाला ताब्यात घेतले. स्वारगेट परिसरातून सकाळी हरवलेला मुलगा पोलिस कौशल्य व नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांच्या कुटुंबियांना परत मिळाला. यावेळी वेदांतच्या वडिलांनी पोलीस अंमलदार होले व लोणी काळभोर पोलिसांचे आभार मानले.
पालकांनी मुलांची काळजी घ्यावी..
”नागरिकांच्या सतर्कतेमुळे आठ वर्षांचा मुलगा त्याच्या कुटुंबियांपर्यंत पोहचू शकला आहे. पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी. तसेच त्यांच्या वळ ओळखपत्र ठेवावे. मुलाने मोबाईल नंबर डायल केल्यानेच हा मुलगा कुटुंबियांना भेटला”, असे संतोष होले यांनी सांगितले.