हनुमंत चिकणे
Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : पुणे शहर पोलिस यंत्रना मागील आठ ते दहा दिवसापासुन “व्हीआयपी बंदोबस्तात” अडकुन पडल्यांची संधी साधत, चोरट्यांनी लोणी काळभोर, थेऊर, सोरतापवाडी, उरुळी कांचनसह पुर्व हवेलीत हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. मागील दहा दिवसाच्या काळात एक फॉर्च्यूनर गाडीसह पाच ते सहा ठिकाणी घरफोडी करुन चोरट्यांनी सत्तर लाखाहुन एधिक रकमेचा ऐवज चोरुन नेला आहे.
सोरतापवाडी येथील घरफोडीची पोलिसांनी पुर्ण माहिती घेण्यापुर्वीच, चोरट्यांनी सोमवारी (ता. ७) मध्यरात्रीच्या सुमारास पुणे – सोलापूर महामार्गावरील अत्यंत गजबजलेल्या थेऊर फाटा परिसरात किचनच्या खिडकीचे ग्रील तोडून तब्बल अडीच लाख रुपये किमतीचे ५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
भगवान रामचंद्र तुपे (वय – ७८, रा, थेऊरफाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे चोरी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घरातील कपाटातील साहित्य व भांडी घरात इतरत्र फेकून नासधूस केली. चोरीच्या वेळी चोरट्यांनी धारदार शस्त्रांचा वापर केल्याचेही तपासात निस्पन्न झाले आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्याकडुन माहितीनुसार, भगवान तुपे हे थेऊर फाटा परिसरात त्यांची पत्नी व मुलासह राहतात. जेवण करून तिघेही वरती असलेल्या खोलीत झोपले होते. घराच्या पाठीमागे मोकळी जागा असून त्याच बाजूला किचन आहे. पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अंगठ्याच्या आकाराचे लोखंडी ग्रील कशाच्यातरी सहाय्याने तोडले व घरामध्ये प्रवेश केला. तसेच बाहेरच्या बाजूला असलेले कुलूप व कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला. यावेळी घरात असलेले सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून बाहेर फेडून दिले. यावेळी कपाटात असलेले पाच तोळे सोन्याचे दागिने घेऊन चोरते पसार झाले. सकाळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
View this post on Instagram
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचनसह परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ मागील आठ ते दहा दिवसापासुन सुरु आहे. दुचाकी व चारचाकी गाड्या चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. आता तर थेट बंद कार्यालय, चारचाकी गाड्या, सदनिकांचे कडी कोयंडे तोडून ऐवज चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत. पोलिसांना घटनेचे सिसिटीव्ही फुटेज व त्यातुन चोरट्यांची जुजबी माहिती मि्ळुनही, पोलिस यंत्रना ढिम्म असल्याचे दिसुन येत आहे.
दरम्यान, कुंजीरवाडी, थेऊर फाटा परिसरात असलेल्या ८ दुकाने तसेच थेऊर फाटा येथील गायकवाड यांच्या घरात कोणी नसल्याची संधी साधत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. तसेच २ महिन्यांपूर्वी धुमाळ मळा परिसरात भरदिवसा १४ ते १५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कलागोविंद कार्यालयाशेजारी असलेले एक स्नॅक्स सेंटर फोडून रोख रकमेसह साहित्य चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता. २) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. कुंजीरवाडीतच आठ दिवसांपूर्वी मेडिकल व हार्डवेअर दुकान फोडले. या चोरीत चोरट्यांना दुकानातील फक्त चिल्लर हाती लागली होती. त्यानंतर चोरट्यांनी सोरतापवाडी स्नॅक्स सेंटर फोडून मुद्देमाल लंपास केला होता.
सीसीटीव्ही व्हायरल..
थेऊर फाटा परिसरात एका दुकानाच्या समोर काही दरोडेखोर गावठी बंदूक घेऊन दिसून येत आहेत. तर काहीच्या पाठीवर असलेल्या पिशवीत कटावणी सारखे हत्यार दिसून येत आहे. सदरच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ६ – ७ तरुण दिसून येत असून २० ते २५ वयोगटातील असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत बोलताना कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे म्हणाले, “लोणी काळभोर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा. ग्रामस्थांनी सावध झोपावे, चोरीबाबत काही शंका आल्यास याबाबत इतरांना मोबाईद्वारे कल्पना द्यावी.”