लोणी काळभोर, ता.०८ : अलीकडे मानव आणि वन्यजिवांमध्ये जगण्यातून संघर्ष निर्माण झाला आहे. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याने वन्यजिवांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे हे निसर्गचक्र, निसर्गसौंदर्य आणि वैविध्यता कायम राखण्याकरिता वन्यजीवाचा संरक्षणाकरिता मानवाने हातभार लावण्याची आता खरी गरज आहे. असे प्रतिपादन लोणी काळभोरचे वन्य परिमंडळ अधिकारी एम व्ही सपकाळे यांनी केले आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन एम व्ही सपकाळे यांनी केले आहे. यावेळी प्राचार्य सीताराम गवळी, वन्य रक्षक अंकुश कचरे, पूजा कुबल पांडुरंग बिखणे,अशोक गायकवाड, नरेश चांडक, रेस्क्यू टीम सदस्या ज्योती स्वामी, पर्यवेक्षिका रेखा पाटील व विलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सपकाळे म्हणाले की, लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक प्रजातींचे संरक्षण विविध योजनांमुळे होत आहे. भारतात १९५२ पासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्यजिवांचे संरक्षण-संवर्धन करून त्याबाबत जागृती करणे हा त्यामागील हेतू आहे. हा हेतू रुजविण्यासाठीच भारत सरकारने ‘इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ’ची स्थापना केली आहे. यातून वन्यजिवांच्या संरक्षणाकरिता प्रयत्न होत आहे. वन्यजिवांना धोका निर्माण करण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत असून, त्याला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. मात्र आता अलीकडच्या काही वर्षांत वन्यजिवांच्या संरक्षणासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे.
यावेळी बोलताना प्राचार्य सीताराम गवळी म्हणाले कि, राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह भारतभर दरवर्षी २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान भारतातील वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. मात्र नागरिकांनी हा केवळ नावापुरता साजरा करू नये. तर प्रत्यक्षात वनस्पती व प्राण्यांची संरक्षण व संवर्धन करावे. असे आवाहन गवळी यांनी यावेळी केले.