लोणी काळभोर, ता.15 : घरी एकटी असलेल्या महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ, दमदाटी व छेडछाड करून किस घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडी पाट परिसरात बुधवारी (ता.14) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश पंडीत पांडे (वय 35, रा दिघी पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कदमवाकवस्ती येथील 36 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गृहिणी असून त्या कुटुंबासोबत कवडी पाट टोलनाका परिसरात राहतात. मंगळवारी फिर्यादी या एकट्या घरी होत्या. तेव्हा गणेश पांडे यांनी फिर्यादी यांच्या मोबाईलवर 66 मिसकॉल दिले. तसेच त्यांच्या पतीलाही फोन करून वारंवार त्रास दिला.
दरम्यान, पांडे हा बुधवारी (ता.14) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घराजवळ आला. त्याने घराचा दरवाजा वाजवुन गोंधळ केला. तेव्हा फिर्यादी यांनी घराचा दारवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर त्याने फिर्यादी यांना मिठी मारून किस घेतला. पांडे याने फिर्यादी यांच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न हाईल असे कृत्य केले. तसेच फिर्यादी यांनी शिवीगाळ करुन दमदाटी केली.
याप्रकरणी पीडित महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कायदा कलम 74, 351, 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करत आहेत.