Loni Kalbhor Crime | लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर, उरुळी कांचन, कोरेगाव मुळसह परिसरात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नागरीकांनो सावधान, आपल्या वस्तूंची काळजी घ्या. अशी चर्चा या भागात रंगली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मगील पंधरा दिवसात घरफोडी, दोन चारचाकी व दुचाकी चोरून नेल्याच्या तक्रारी लोणी काळभोर पोलिसांकडे आल्या आहेत. यामध्ये एका कोरेगाव मूळ व उरुळी कांचन येथील चोरीचाही समावेश आहे.
बीट मार्शलचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन,पण….
दरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तसेच उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्र परिसरात तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते बीट मार्शलचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. यामुळे चोऱ्या व घरफोड्या कमी होतील हा पोलिसांचा दावाही, मागील काही दिवसांतील चोऱ्यांमुळे फोल ठरला आहे.
लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीत मागील एक वर्षापूर्वी उरुळी कांचन येथे अज्ञात दरोडेखोरांनी एका महिलेला मारहाण करून सोन्याचे दागिने लुटून नेले होते. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अद्यापही त्याचा तपास लागू शकला नाही. उरुळी कांचन येथील दातार कॉलनी परिसरात महिला दिनाच्या दिवशीच अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश किमती ऐवज व रोख रक्कम चोरून नेली होती.
उरुळी कांचन व कोरेगाव परिसरातून एकच दिवशी दोन चारचाकी गाड्या चोरून नेल्या होत्या. मात्र त्यातील एक चारचाकी गाडी वाटेतच बंद पडल्याने मिळून आली तर दुसऱ्या गाडीचा अद्यापही शोध लागू शकला नाही. सोमवारी (ता. २७ मार्चला) हि घटना घडली आहे. याबाबतची तक्रार दाखल होऊनही, चोरटे हाती लागू शकलेले नाहीत. कोरेगाव मूळ परिसरातही घटना घडल्या आहेत. मात्र पोलिस अद्याप चोरट्यांपर्यंत पोहचू शकलेले नाहीत.
अनेक घरफोड्या व वाहने, चोरीच्या घटना अद्याप अनडिटेक्टच..!
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक दुचाकी व चारचाकी गाडी चोरीला गेल्या आहेत. तसेच पुणे – सोलापूर महामार्गावर मोठमोठे अपघात झाले आहेत. या अपघातात अनेकांना आपल्या जीवाशी मुकावे लागले आहे. या अपघातात अज्ञात वाहने धडक देऊन निघून गेली मात्र त्या वाहनांचा व चालकांचा आजूनही थांगपत्ता मिळू शकला नाही. तसेच अनेक घरफोड्या व वाहने चोरीच्या घटना अद्याप अनडिटेक्टच आहेत.
नेटवर्क संपले ; डीबी कुठंय?
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे सध्या खबऱ्यांचे नेटवर्क संपले आहे. मागील सहा ते सात महिन्यात कोणत्याही घटनेचा तपास डीबी पथक करू शकले नाही.त्यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस ठाण्याची गुन्हे प्रकटीकरण शाखा काय करते? ती योग्य काम करत नसेल, तर ती हवी कशाला असा दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. एखादा गुन्हा घडला तर त्या ठिकाणची सर्व माहिती घेऊन तत्काळ त्या आरोपीपर्यत पोहोचण्याचे काम डीबीचे आहे.
मात्र लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील डीबी पथकाची कामगिरी काहीच नाही. तगडी पोलिस यंत्रणा असतानाही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिक हवालदिल झाले असून पोलीस ठाण्याबाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…