सविंदणे / अमिन मुलाणी : सध्या श्री गणरायाचे आगमन व्हायला काही दिवस शिल्लक आहेत. मंगळवारपासून (ता.१९) दहा दिवसीय गणेशोत्सव सुरू होत आहे. प्रत्येक घरात गणपतीची मूर्ती स्थापन केली जाईल. शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्ती घरोघरी, पूजेसाठी आणि पर्यावरण सुधारण्यासाठी उत्तम राहतात. या मूर्ती पाण्यात सहज विरघळतात. त्याउलट प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्या मूर्ती पर्यावरण व प्रदूषणास कारणीभूत ठरतात. त्यामुळे घरात केवळ मातीचीच गणेशमूर्ती स्थापन करावी, असा आग्रह सर्वांनी धरणे आवश्यक आहे.
गणेश चतुर्थीला आणखी सात दिवस आहेत. मातीच्या गणेशमूर्ती बनवण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे. या दिवसांत मूर्ती बनवून सुकायला पुरेसा वेळ मिळेल. त्यानंतर रंगरंगोटी करून मूर्तीचे सौंदर्य वाढवता येईल. पं. मनीष शर्मा यांच्या मते, मातीपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा धर्मग्रंथात सर्वोत्तम मानली गेली आहे. मातीच्या मूर्तीमध्ये पाच तत्वे असतात. माती म्हणजे पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी आणि आकाश या पंचभूत घटकांपासून आपले शरीर तयार झाले आहे आणि या पंचभूत घटकांनी मिळून मातीची गणेशमूर्ती तयार होते.
गणेशमूर्ती बनवण्यासाठी कोणती माती वापरावी?
मूर्ती तयार करण्यासाठी नदी, तलाव किंवा इतर कोणत्याही स्वच्छ ठिकाणची माती वापरावी. मातीमध्ये झाडाची मुळे किंवा गवत नसावे हे लक्षात ठेवा.
मातीची गणेशमूर्ती कशी बनवावी?
१) ओल्या मातीपासून ५ समान आकाराचे गोळे बनवा. प्रथम गणेशासाठी आसन बनवावे. आसनाचा आकार आपल्या इच्छेनुसार गोल किंवा चौकोणी ठेवू शकता.
२) दुसऱ्या गोळ्यापासून गणेशाचे पोट करून ते आसनावर विराजित करावे. तिसरा गोळा दोन समान भागांमध्ये विभाजित करा. या दोन भागांतून एका भागातून श्रीगणेशाचे दोन पाय आणि दुसऱ्या भागातून दोन हात बनवा.
३) मातीच्या चौथ्या गोळ्यापासून श्री गणेशाचे मस्तक आणि सोंड तयार करा. गणेशाच्या पोटाच्या वर डोके आणि सोंड लावून घ्या.
४) मातीच्या पाचव्या गोळ्यापासून श्री गणेशाचे कान, दात, डोळे आणि मुकुट तयार करून घ्या. हे सर्व भाग जोडून मूर्ती तयार होईल.
५) मूर्ती बनवल्यानंतर घरामध्ये सूर्यप्रकाश येईल, अशा ठिकाणी ठेवा. काही दिवसांत मूर्ती सुकून जाईल आणि यानंतर मूर्तीला इच्छेनुसार रंग देऊ शकता.
गणेशाची साधी सोप्या पद्धतीने पूजा करू शकता.
मातीच्या गणेशमूर्तीला थोडे पाणी अर्पण करावे. फुलांनी शृंगार करावा. दुर्वा अर्पण कराव्यात. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. श्रीगणेशासोबतच शिव आणि पार्वतीची पूजा करा. शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यात जल अर्पण करा. श्रीगणेशजी, शिव आणि पार्वती यांना वस्त्र अर्पण करावेत. श्रीगणेशासमोर धूप-दीप लावून आरती करावी. पूजेत श्री गणेशाय नमः, ओम नमः शिवाय नमः या मंत्राचा जप करावा.
बाजारपेठेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आढळल्यास त्या विकत घेतल्या जाऊ नयेत. यासाठी तरूणांमधून पुढाकार घेणे आवश्यक आहे. असे केल्यास पर्यावरण व प्रदूषणापासून आपण वाचू शकतो.