अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील जांबुत येथील महिलेवर हल्ला करून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी १५ पिंजरे लावण्यात आले आहेत. आज सकाळी यातील एका पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, या ठिकाणी आणखी बिबटे असून नर भक्षक बिबट्या हाच का याबाबत सांगणे कठीण आहे.
२६ ऑगस्ट रोजी जांबुतेची मुक्ताबाई खाडे (५६ वर्षे) या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक महिला यांच्यावतीने वनविभागाविरोधात संतप्त झाले होते. तर काल जांबुत या ठिकाणी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनही केले होते. महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच वन विभागाने या ठिकाणी वेगवेगळ्या भागात १५ पिंजरे लावले होते. त्यात सकाळी महिलेच्या घरापासून आठशे मीटर लांब अंतर असलेल्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे. या बिबट्याचे वय अंदाजे तीन वर्षे असल्याचे वन विभागाने सांगितले आहे.
बिबट्या जेरबंद झाला असला तरी या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे. ही संख्या आटोक्यात आणणे वनविभागा पुढेही आव्हान आहे. त्यामुळे पुढील काळात या भागात मनुष्यावर बिबट्याचे हल्ले होऊ शकतात. वनविभागाकडून पिंजऱ्यात कैद झालेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात सोडण्यात आले आहे. माणिकडोह येथील डॉक्टरांनी सदर बिबटची तपासणी केली असून ती चार वर्षे वयाची मादी असल्याचे वनविभागाचे कर्मचारी महेंद्र दाते यांनी सांगितले आहे.
वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; गुनाट येथील प्रकार
शिरुर-तांदळी रस्त्यावर गुनाट निर्वी गावच्या शिवेजवळ पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला आहे. वाहनाबाबत कुठलीही माहिती वन विभागाला मिळालेली नाही. ही घटना गुनाट-निर्वी गावच्या शिवेजवळ फंड वस्तीनजीक मंगळवार (दि. २७) रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घ्त्नास्थाली दाखल झाले. त्यांनी मृत बिबट्या ताब्यात घेतला. गेल्या अनेक दिवसांपासुन या भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. शेतकऱ्यांची जनावरे तसेच पाळीव कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. विशेषतः बकऱ्यांना बिबट्याने टारगेट केले होते. त्यामुळे गुनाट परीसरात भीतीचे वातावरण पसरले होते.