Leopard Attack : उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील गिरमे वस्ती परिसरात शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच वळती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. २०) बिबट्याने पुन्हा हल्ला केला. यामध्ये एका सव्वा वर्षाच्या वासराचा फडशा पाडला आहे.
शंकर सुभान कुंजीर (रा. वळती. ता. हवेली) असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शंकर कुंजीर हे वळती या ठिकाणी राहत असून, त्यांचा पशुपालनाचा व्यवसाय आहे. तसेच त्यांची डोंगराच्या पायथ्याशी शेती आहे. या शेतात रोज त्यांच्याजवळ असलेली जनावरे घेऊन जातात.
बुधवारी दुपारी डोंगराच्या पायथ्याशी जनावरे चारत असताना एका गाईचे अंदाजे दीड वर्षाचे वासरू त्यांना दिसून आले नाही. त्यावेळी त्यांनी जनावरे चरत असेलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्यांना वासरू हे खाली पडल्याचे दिसून आले. जवळ जाऊन पाहिले असता वासराचा फडशा पडल्याचे दिसून आले. तसेच काही अंतरावर जागोजागी पडलेले रक्तानुसार तसेच काही पाऊलखुणांवरून बिबट्याने वासरू मारल्याचे निदर्शनास आले. यामुळे शेतकऱ्याचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे कुंजीर यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना सांगितले.
बिबट्याच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
घरी येऊन त्यांनी त्यांच्या मुलांना याबाबतची माहिती दिली. त्यावेळी त्यांच्या मुलांनी जाऊन पाहणी केली असता बिबट्याच्या पाऊलखुणा दिसून आल्या. एक महिन्याच्या अंतरात बिबट्याने वारंवार पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याने शेतकरी, कामगारांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
वनविभागाला नाही गांभीर्य ; पिंजऱ्याचा बंदोबस्त अद्याप नाहीच…!
उरुळी कांचन शहराजवळ मानवी वस्तीजवळ काही अंतरावर बिबट्या येऊनही वनविभाग कारवाईचे गांभीर्य दाखवत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मागील एका महिन्यापासून एक पिंजराही वनविभागाला मिळाला नसल्याने वनविभागाला नागरिकांच्या सुरक्षिततेचे देणे-घेणे नसल्याची विदारक परिस्थिती सध्या पूर्व हवेलीतील शिंदवणे, उरुळी कांचन, वळती येथील नागरिक पाहत आहेत.
विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने पिकांना पाणी देणे अशक्य
वळती, शिंदवणे परिसरात जनावरे पाळणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. दुग्धव्यवसाय मुख्य व्यवसाय असल्याने जनावरे मोठ्या प्रमाणात पाळली जात आहेत. त्यातच डोंगराळ भाग असल्याने या ठिकाणी जनावरे चरण्यासाठी मेंढपाळ व पशूपालन करणार्यांना डोंगरावर गुरे-ढोरे चरण्यासाठी घेऊन जाणे कठीण झाले आहे. तसेच बिबट्याच्या भीतीने तसेच दिवसा विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने रात्रीचे पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने पिकांना पाणी असूनही पाणी देता येत नसल्याची परिस्थिती सध्या परिसरात आहे.
जीवितहानी झाल्यावरच येणार का जाग?
अनेक ठिकाणी बिबट्यांच्या पायांचे ठसे देखील नागरिकांना आढळून आले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या आहेत. पण अद्याप यावर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे मोठी जीवितहानी झाल्यावरच वनविभागाला जाग येणार का? असा संतप्त सवाल शिंदवणे, वळती हद्दीतील नागरिकांकडून केला जात आहे.