पुणे : शहरात पावसाचा जोर कमी झाला असून, गुरुवारी (दि. १८) तुरळक सरी पडल्या. दरम्यान, पुढील सहा दिवस शहरात हलका ते मध्यम, तसेच जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच घाटमाथ्यावर ऑरेंज व यलो अलर्ट मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मागील आठवड्यात शहर, परिसरात दमदार पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. शहरासह जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाला अनुकूल वातावरण असून, घाट विभागात गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.
येत्या १९ ते २० जुलै दरम्यान, आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून, हलका, मध्यम पावसाच्या सरी पडणार आहे. तसेच २१ ते २४ जुलै दरम्यान, मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच घाट विभागातील तुरळक भागात ऑरेंज व यलो अलर्ट असून, मुसळधार पाऊस पडणार आहे. शहरात काही काळ ढगाळ हवामान असल्यामुळे तापमानात घट झाली आहे. शहरात कमाल तापमान २७.४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.२ अंश सेल्सिअस तापमान होते.