संदीप बोडके
पुणे: ” ‘क’ प्रत मोजणी नकाशासाठी पंचवीस लाखांची लाच द्यावी लागेल, अन्यथा साहेब हेलीकॉप्टर शॉट लावतील” असे बोलून मालमत्तेचे नुकसान करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हवेली मोजणी कार्यालयाचे उपअधिक्षक अमर पाटील व भूकरमापक किरण येटोळे यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. अनियमित कारभाराची चौकशी सुरु असताना लाच मागणीमुळे हवेली मोजणी कार्यालयाच्या उरल्या सुरल्या अब्रूच्या चिंधड्या उडाल्या आहेत. त्यामुळे हवेली मोजणी कार्यालयाची नागरिकांच्या मनातील छबी मलीन झाली आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार असल्याने अद्याप यामध्ये कोणासही अटक झालेली नाही.
हवेली मोजणी कार्यालयाच्या गलथान व भोंगळ कारभाराबाबत “पुणे प्राईम न्यूज” ने वेळोवेळी परखड वृत्तांकन केले आहे. विशेष म्हणजे शासन नियुक्त पथकाकडून हवेली मोजणी कार्यालयाच्या अनियमित कारभाराची चौकशी अद्याप सुरुच आहे. त्या चौकशीचा अंतिम अहवाल अद्याप समोर आलेला नाही. असे असताना लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने भूमी अभिलेख विभागात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी तक्रारदार यांनी अगोदरच अनियमित व गलथान कारभाराबाबत महसूलमंत्री, जमाबंदी आयुक्त कार्यालय व पोलीस कमिशनर यांच्याकडे हवेलीच्या मोजणी कार्यालयाबाबत तक्रारी केल्या होत्या. तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीला 50 लाखांची लाच मागणी झाली होती. तसेच सवलत म्हणून शेवटी 25 लाखांची रक्कम मागण्यात आली. मात्र रक्कम न दिल्याने मोजणी हद्द नकाशाची चुकीची “क” प्रत तयार केल्याची तक्रार तक्रारदार यांची आहे. या प्रकरणावरूनच उपअधीक्षक अमर पाटील व भूमापक किरण येटोळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
हवेली मोजणी कार्यालयाच्या कामकाजाच्या पध्दतीवरुन नागरिकांच्या एकदम तिखट प्रतिक्रिया येत आहेत. जिल्हा व हवेली मोजणी कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यावरुन जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख कार्यालयाने विशेष पथक नियुक्त करत हवेली उपअधीक्षक व पुणे जिल्हा अधीक्षक यांच्या कामकाजाची चौकशी लावली आहे. 20 मार्चपासून हवेलीच्या मोजणी कार्यालयाची तपासणी सुरू असताना कार्यालयाचे उपअधिक्षक अमर पाटील व भूकरमापक किरण येटोळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
अमर पाटील यांना हडपसर येथील मोजणी प्रकरण भोवलं
हडपसर येथील सर्वे नं. 181/3, 181/4अ, 181/6 व 181/9/1 या मिळकतीची सन 2023 व सन 2024 मध्ये भुमीअभिलेख कार्यालय, हवेली, पुणे यांच्याकडून शासकीय फी अदा करुन कायदेशीर रितसर पद्धतीने मोजणी तक्रारदाराने करुन घेतली होती. मात्र सदर जागेच्या मोजणीनंतर हद्द निश्चिती करण्यासाठी व तसा मोजणी नकाशा देण्यासाठी ‘हेलिकॉप्टर शॉट लाच’ मागणी व चुकीच्या मोजणीचे ‘क’ प्रत प्रकरण उपअधीक्षक पाटील आणि भूमापक येटोळे यांच्यावर चांगलेच शेकले असून गुन्हा दाखल झाला आहे.
हवेलीतील मोजण्या संशयाच्या भोवऱ्यात
हवेलीत मर्जीतील भूकरमापकांना अधिकची मोजणी प्रकरणे देऊन आर्थिक हितसंबध जपण्याचा आरोप आहे. यासाठी मोजणी कार्यालयात शासकीय टोळी सक्रिय असून मोजणी नकाशा व मिळकतीचा ताबा याबाबत “वाजवून” कामे होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे हवेलीच्या मोजणी कार्यालयाबाबत जनमानसात प्रचंड चीड आहे. त्याचाच पुरावा म्हणून उपअधीक्षक अमर पाटील व भूकरमापक येटोळे गुन्ह्यात अडकले आहेत. त्यामुळे हवेलीत झालेल्या मोजण्या आता रडारवर आलेल्या आहेत.
अवैध संपत्तीची चौकशी होणार का ?
हवेलीचे उपअधिक्षक अमर पाटील व भूकरमापक किरण येटोळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अनियमित कारभार व त्याला आर्थिकतेचा मोठा हातभार यामधून बक्कळ माया हवेलीतून संबंधित अधिकाऱ्यांनी गोळा केल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींच्या व नातेवाईकांच्या अवैध संपत्तीची चौकशी होण्याची मागणी यानिमित्ताने नागरिकांनी केली आहे.