जीवन सोनवणे
खंडाळा, (सातारा) : सहकारातील किसनवीर व खंडाळा साखर कारखाना या संस्था शेतकरी सभासदांच्या मालकीच्या राहाव्यात व दोन्ही कारखान्यांच्या हितासाठीच बदलत्या राजकीय परिस्थितीत आपण कॅबिनेट मंत्रिपद नाकारले. शेतकरी सभासदांनी दाखविलेला विश्वास व्यर्थ जाऊ देणार नाही, असा विश्वास किसनवीर उद्योग समूहाचे चेअरमन आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन चेअरमन व्ही. जी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर करण्यात आले होते. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, ‘शंभर ते एकशे दहा कोटी रुपयात उभा राहणाऱ्या खंडाळा साखर कारखान्यावर सुमारे २८० कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. अशातच हा कारखाना उभारणीपासून पूर्ण क्षमतेने चाललेला कधीच चाललेला नाही. यामुळेच येथील तोट्याचा आकडा वाढत आहे.
ही संस्था शेतकऱ्यांच्याच मालकीची राहावी ही आपली प्रामाणिक इच्छा असून तालुकावासियांनीही गांभीर्य ठेवले पाहिजे. कारखान्याचे भागभांडवल वाढले पाहिजे. यासाठी अधिका अधिक लोकांनी शेअर्स खरेदी करावेत’.
याचबरोबर कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी याच कारखान्याला द्यावा असेही आवाहन त्यांनी केले. खंडाळा कारखाना चालू करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी स्वतंत्र करार करण्यात आला आहे. यासाठी साडे तेरा कोटी ॲडव्हान्स देण्यात आला असून, आपण पूर्ण तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन्ही कारखान्यांत सत्तांतर होण्याच्या अगोदर तीन वर्ष तत्कालीन संचालक मंडळानी एक रुपयाची ही रक्कम कर्ज खात्यात भरलेली नव्हती आणि त्यामुळेच लिलावाच्या नोटिसा बँकांनी काढल्या. यासाठी खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना सक्षम अशा तिसऱ्या भागीदाराला चालवायला देण्याचा ठराव करण्यात आला असून, प्रचंड गोंधळात हा ठराव मंजूर करण्यात आला.
मागील दहा वर्षांचे दोन्ही कारखान्यांचे ऑडिट करणार..
खंडाळा आणि किसनवीर या दोन्ही कारखान्यांची निवडणुक इच्छा नसतानाही सभासदांच्या हितासाठी लढवली आणि सभासदांनी ही मोठ्या विश्वासाने विजयी कौल दिला. प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केल्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाचे चकित करणारे अनेक कारनामे समोर आले आहेत. त्यामुळेच मागील दहा वर्षाचे दोन्ही कारखान्याचे ऑडिट करणार असून, त्यांनी केलेले पाप त्यांच्याच डोक्यावर ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व्ही. जी. पवार यांनी केले तर आभार चंद्रकांत ढमाळ यांनी मानले.