गणेश सुळ
Kedgaon News : केडगाव : पुणे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. सप्टेंबरचे दहा दिवस उलटूनही तालुक्यातील ओढे, नाले, तलाव, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाऊस नसल्याने पिके जळून जात आहेत. यातच डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील इतर बँका रिझर्व बँकेच्या अधीन राहून थकीत कर्जासंबंधी विविध तरतुदी करत असते. परंतु पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व सहकारी संस्थेकडून कोणतीही तरतूद केली जात नाही. बॅंकेने शेतकऱ्यांना सवलत दिल्यास, शेतकऱ्याचा कर्जाचा भार कमी होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.
बॅंकेने शेतकऱ्यांना सवलत दिल्यास, कर्जाचा भार कमी होईल, अशी अपेक्षा…..
यापूर्वीही शेतकऱ्यांना निसर्गाच्या दुष्टचक्राचा सामना करावा लागला आहे. कोविड १९ हा आजार, लाळीच्या विषाणूचा प्रादूर्भाव, लंपी आजार, शेतमालाला कवडीमोल भाव, पुन्हा दुष्काळजन्य परिस्थिती… यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत असल्याने आता जगावे की मरावे, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.
अपुर्या पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. पिकाला सध्या पाण्याची गरज आहे. पाऊस नसल्याने जिरायती भागातील शेतकर्यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. अपुर्या पावसामुळे विहिरी, कुपनलिकांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. बागायती पट्टा म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. पिकांचे उत्पादन घटले असून, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांच्या चार्याची समस्या भेडसावू लागली आहे. हिरवा चारा कमी पडू लागला आहे. त्याचा परिणाम दुग्धोत्पादनावर होत आहे. पावसाने मारलेली दडी शेतकर्यांच्या अर्थकारणावर परिणाम करू लागली आहे. यासाठी या सहकारी बँकांनी व सहकारी संस्थांनी शेतकरी वर्गासाठी पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज परतफेड करण्यासाठी विविध तरतुदी राबवणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.
याबाबत बोलताना दौंड तालुक्यातील एकेरीवडी येथील शेतकरी भरत टकले म्हणाले की, सर्व राष्ट्रीयीकृत बँका शेतकरी पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज परत फेडीसाठी विविध तरतुदींमधून सवलत देते. परंतु सहकारी बँक, सहकारी संस्थांकडून कोणतीही सवलत दिली जात नाही. शासन निर्णयानुसार मुदतवाढ दिलेला जीआर तरी अंमलात आणावा व अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी वर्गाला योग्य ती सवलत द्यावी, अशी आमची मागणी आहे.