बारामती : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याच्या खटल्यात अमोल कृष्णा पांढरे (रा. भिगवण, ता. इंदापूर) या कराटे प्रशिक्षकास येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. शहापुरे यांनी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, २०१७ पासून ही पीडिता अमोल पांढरे याच्याकडे कराटे शिकण्यासाठी जात होती. पांढरे याने तिच्याशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर १ ऑगस्ट २०१८ रोजी तिला पळवून नेट तिच्याशी वैराग (ता. बार्शी) आणि पुणे येथे वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केले. भिगवण पोलिसांनी १० सप्टेंबर २०१८ रोजी आरोपी व पीडिता यांना ताब्यात घेतले होते.
त्याच्याविरोधात अपहरण, पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक बी. एन. पवार यांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. दरम्यान, आरोपीकडून पीडिता स्वइच्छेने सोबत आल्याचा बचाव करण्यात आला होता. मात्र, कायद्याने अल्पवयीन मुलीची संमती ग्राह्य धरता येत नाही, तसेच या प्रकरणात पीडितेची संमती नव्हती. तसेच आरोपीविरुद्ध सबळ पुरावा होता.
तो विवाहित असूनही त्याने हा गुन्हा केल्याचे ओहोळ यांनी न्यायालयापुढे मांडले, ते ग्राह्य धरत शारीरिक शोषणप्रकरणी न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, अपहरणप्रकरणी ७ वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, विवाहाची सक्ती केल्याप्रकरणी कलम ३६६ नुसार ७ वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, पोक्सोअंतर्गत ७ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड अशा विविध कलमांनुसार वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या आहेत. या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.
या खटल्यात सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण ११ साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी, पीडितेचा जन्माचा दाखला देणारे अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.