संदीप बोडके
लोणी काळभोर (पुणे): हवेली भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक अमर पाटील व भूकरमापक किरण येटोळे यांच्यावर चुकीच्या मोजणीमुळे मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपी अद्याप फरार आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच हवेलीत मोजणी तारखेच्या अगोदरच, नोटीस न बजावताच मोजणीची ‘क’ प्रत दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
यासाठी मोजणी प्रणालीच्या ऑनलाईनवर वेगळी तारीख, तर ऑफलाईनवर वेगळीच तारीख दाखवत सहभागी भूकरमापकाने हातचलाखीने हात ओले करत मोठी आकडेमोड केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हवेली मोजणी कार्यालयातील काळाबाजार उघड झाला आहे.
सरकारी मोजणीची तारीख मिळावी, यासाठी नागरीक शासकीय कार्यालयात चकरा मारत असतात. मिळालेल्या मोजणी तारखेलाही सरकारी मोजणी होण्याची शक्यता कमीच असते. कारण भूकरमापक आपल्या व्यस्त वेळापत्रकांतील सोयीनुसार पुढील मोजणीच्या तारखांच्या नोटीसा बजावत असतात. परंतु, हवेलीमध्ये मोजणीच्या तारखेअगोदरच ‘क’ प्रत दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये गटातील सहधारकांना व चर्तुसिमा धारक शेतकऱ्यांना कोणत्याही नोटीसा काढलेल्या नाहीत.
मोजणी रजिस्टरवरील ‘कोकरे’ कडे संशयाची सुई
मौजे पिंपरी सांडस (ता.हवेली) येथील गट नबंर 427 च्या अतितातडी हद्दकायम मोजणीमध्ये मोजणी रजिस्टर नबंर 12025 बाबत हा प्रकार मोजणी कार्यालयाने केला आहे. 6 जून 2024 रोजी मोजणीची तारीख असताना 3 एप्रिल 2024 ला मोजणी व 5 एप्रिलला ‘क’ प्रत दिल्याचे कार्यालयीन रजिस्टरला नमूद आहे. या मोजणी प्रकरणात सहधारक व लगतधारक शेतकऱ्यांना नोटीस काढलेली नाही. तसेच ऑनलाईनवर भूकरमापकाचे नाव नाही. मात्र, कार्यालयीन रजिस्टरवर मोजणीचा दिनांक, ‘क’ प्रत दिल्याचा दिनांक व त्यापुढे ‘कोकरे’ हे नाव लिहिल्याने गैरप्रकारच्या कारभारातील संशय वाढला आहे.
सेटींगमधील मोजणी प्रकरणातील हरकत अर्ज लपवून ठेवण्याचा प्रकार
मौजे पिंपरी सांडस येथील मोजणी प्रकरणातील मिळकतीबाबत न्यायालयीन दावे प्रलंबित आहेत. त्यामुळे गटातील सहधारक यांनी मोजणीस हरकत असलेला अर्ज कार्यालयात दाखल केला होता. मात्र, हा अर्ज तसाच दाबून ठेवत मोजणी तारखेच्या अगोदरच मोजणीची ‘क’ प्रत दिल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे सेटींगमधील मोजणी प्रकरणात अडथळा आला, तरी काम वाजवले जाते. यामध्ये कार्यालयीन कर्मचारी व अधिकाऱ्यांचा स्पष्ट सहभाग उघड झाला आहे. सहभागातूनच हरकत अर्ज लपवून ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रस्तुतच्या प्रकरणात सामील असलेल्या कार्यालयीन कर्मचारी व अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित भूकरमापकाची विभागीय चौकशी होणार का ?
तक्रारदार स्वप्नील भोरडे यांच्या तक्रारीवरून जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक संजय कुंभार यांनी भूमी अभिलेखच्या उपसंचालकाना पत्र दिले आहे. ऑनलाईन व ऑफलाईन मोजणी तारखेत तफावत दिसून येते. तसेच सदर मोजणी नियमबाह्य व खोटी असल्याने मोजणी रद्द करण्याबाबत व दोषींवर कारवाईची मागणी तक्रारदाराने केली आहे. अर्जदाराच्या तक्रारींच्या अनुषंगाने नियमांतर्गत सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशीची कारवाई प्रस्तावित करुन केलेल्या कारवाईचा अहवाल कार्यालयास कळवणेबाबत कुंभार यांनी सूचना दिलेल्या आहेत.
ऑनलाईन प्रणालीवर मोजणीची तारखेबाबत माहिती मिळाली. त्यानतंर मी हरकत अर्ज दाखल केला. मात्र, तरीही मोजणी दिनांकाच्या अगोदरच ‘क’ प्रत संबंधितांना देण्यात आली. संबंधित मिळकतीबाबत न्यायालयात दावे सुरू आहेत. ऑनलाईनवर वेगळी ‘क’ प्रत व ऑफलाईनवर वेगळीच ‘क’ प्रत असा बनावट प्रकार सुरू असल्याने संबधितावर गुन्हा दाखल करणार आहे. तसेच सहभागी भूकरमापकांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणेबाबत वरिष्ठ कार्यालयात वरिष्ठांना समक्ष भेटून तक्रार केली आहे.
– स्वप्नील भोरडे, तक्रारदार