राजेंद्रकुमार शेळके
Junnar News : जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या ऐतिहासिक दस्तावेजामध्ये ‘नाणेघाटातील पाऊलखुणा’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची भर पडली. याचबरोबर ‘शेतीचे अभंग’ व ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आळे येथे झाले.
आळे येथे काव्यसंग्रहाचे प्रकाशन
जुन्नर तालुक्याला प्राचीन वारसा लाभला आहे. त्यामध्ये नाणेघाटाच्या २२०० वर्षांच्या सातवाहनकालीन ब्राह्मी भाषेचा अभिजात मराठी भाषेचा पुरावा यासह जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमी, ऐतिहासिक गडकोट, सांस्कृतिक, भौगोलिक, कला, आध्यात्मिक, साहित्यिक, पुरातत्व नोंदीसह वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा मागोवा घेत जुन्नर जन्मभूमी आणि कर्मभूमी असणाऱ्या १६७ कवींच्या कविता समाविष्ट असणाऱ्या एकमेवाद्वितीय ‘नाणेघाटातील पाऊलखुणा’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे लोकार्पण उत्साहात झाले.
याचवेळी १०२ कवींच्या अभंगरचना असणारा ‘शेतीचे अभंग’ तसेच पाटबंधारे खात्यातील संवेदनशील निवृत्त अभियंता, साहित्यातील नवकवींना प्रोत्साहन देत स्वानुभवातून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या व्यथा, विस्थापितांचे दु:ख आणि दुसरीकडे लाभार्थ्यांची शेती हिरवीगार झाल्याने आर्थिक व जीवनशैलीत झालेला बदल या दोन्हींच्या वास्तवतेतून मांडलेला (Junnar News) ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन आळेफाटा येथील अगत्य बॅंक्वेट हाॅल येथे झाले. याप्रसंगी स्तंभलेखक संजय नलावडे यांच्या ग्रंथाली प्रकाशित ‘शिवनेरीची श्रीमंती’ या आगामी पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरणही करण्यात आले.
जुन्नर तालुक्याच्या साहित्यात रूची व जाण असणारे व्यासंगी माजी आमदार दिलीप ढमढेरे, ग्रामीण कथाकार ज्यांचे जवळपास २०० कथासंग्रह, कादंबरी प्रकाशित आहेत असे पिंपळवंडीचे सुपूत्र प्राचार्य द. स. काकडे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार आणि साहित्यिक भास्कर हांडे, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व बोटा येथे झालेल्या पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे जनक प्रा. मा. रा. लामखडे, (Junnar News) जुन्नर तालुक्यातील कृषी क्षेत्रात नवनवीन संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक कृषीभूषण अनिल मेहेर तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी व साहित्य पत्रिकेचे संपादक पुरूषोत्तम काळे या वेळी उपस्थित होते.
शिवांजली साहित्यपीठ चाळकवाडीचे संस्थापक तसेच कवितासंग्रहाचे मुख्य संपादक व ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ या कवितासंग्रहाचे निर्माते इंजिनिअर शिवाजीराव चाळक, इतिहास संशोधक प्रा. लहू गायकवाड, स्तंभलेखक संजय नलावडे, (Junnar News) पुण्यातील यशोदीप पब्लिकेशन्सच्या प्रा. रुपाली अवचरे, विजय लोंढे या तिन्ही पुस्तकांचे संपादक, सहसंपादकांच्या हस्ते तर मान्यवर ग्रामस्थ, कवी, लेखक, रसिक यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात हा प्रकाशन सोहळा पार पडला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News : जुन्नरचे आमदार अतुल बेनके बनले हजारो बहिणींचे भाऊराया…