युनूस तांबोळी
Junnar News : पुणे : सनईवर बोट फिरावं अन् शब्दांमधून सूर जुळावा… ताशा, ढोल, संबळावर काड्यांनी ताल धरावा, त्याच ताकदीनं संगीतमय मैफीलीला रंगत चढावा… हलगी ढोलकीचा कडकडाट अन् तुणतुण्याला मिळावी टाळाची साथ… सुरत्यांनी ताल धरावा अन् सूर लागला की शाहिरी भाषेने माना डोलवाव्यात… शब्द, सुरांना वाद्यांची जोड देत मैफल सजविणारे असे पट्टीचे कलाकार आजही बेल्हे (ता. जुन्नर) येथे आपली कला सादर करून उपजीवीका करत आहेत. अनेक सण, उत्सव, कार्यक्रमात त्यांना आजही मागणी आहे. अनेक कलाकार वृद्धावस्थेत देखील त्यांची ही कला मोठ्या निगुतीने जोपासत आहेत.
बेल्हे येथे भरविला जातो तमाशा उत्सव
बेल्हे (ता. जुन्नर) या गावात कलेची जोपासना केली जाते. या ठिकाणी तमाशा उत्सव भरवला जातो. त्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य मोलाचे असते. तीन दिवस चालणाऱ्या या तमाशा उत्सवाला नामवंत तमाशा फड आपली कला सादर करतात. जुने कलाकार अहमदभाई बेल्हेकर, विष्णूबुवा बांगर, नाथा बांगर, दत्ता महाडिक पुणेकर, फकिरभाई बेल्हेकर यांनी ही कला जोपासली आहे. माशूमभाई बेल्हेकर यांनी तमाशात ढोलकी वादन करून ही कला जोपासली आहे.
मुंबई येथील बांगडीवाला, रंगभूवन थिएटरला जुन्या तमाशात त्यांच्या या कलेला मोठा सन्मान होता. ढोलकीने ताल धरला की टाळ्या, शिट्ट्या अन् फेटा उंचावून त्यांना दाद मिळत असे. त्या काळात जत्रा, यात्रांमध्ये खुला तमाशा असायचा. मोठ्या तमाशा फड मालकांकडे तंबूतला तमाशा असायचा. (Junnar News) त्या काळात देखील या कलाकारांनी आपल्या कलेतून रसिक प्रेक्षक निर्माण केला. तमाशाचा हंगाम संपला की लग्नसराई सुरू व्हायची. कलाकार म्हटल की अठरा विश्व दारिद्र्य हे ठरलेलंच. त्यातून लग्नात ताशा, ढोल, संबळ, सनई या वाद्यांना महत्व प्राप्त व्हायचं. मिरवणुकीत या वाद्य कलाकारांना महत्त्व असायचं. यात्रेत दिवसा उत्सवात वाद्यकाम तर रात्री तमाशातील वाद्य कलाकार म्हणून काही कलाकारांनी प्रपंच चालवला आहे.
View this post on Instagram
बेल्हे ( ता. जुन्नर ) येथील बशीरभाई कुरेशी हे नामवंत ताशा वादक आहेत. आजही त्यांच्या ताशा वादनाने ते रसिकांना मंत्रमुग्ध करतात. ज्या काळात सनई वादक नव्हते त्या काळात शब्दावरून ताशा-ढोल वादनाची कला त्यांनी अवगत केलेली आहे. जुन्या सवारी या वादनात त्यांचा हातखंडा होता. सवारी, चार चोपी, नवबा अशा विविध प्रकाराने त्यांचे ताशावादन असायचे.
त्यानंतर सनई वाद्य सुरू झाले. (Junnar News) तेथून सनईच्या सुरावर त्यांनी ताशा वादनात रसिकांना खिळवून ठेवले. आजही त्यांना पुणे, नगर, मुबंईसारख्या ठिकाणी मागणी असते. वयाच्या ७३ व्या वर्षी देखील त्यांनी ही कला जोपासली आहे. जुनी वाद्य आणि संगीत जोपासना ही नवीन कलाकारांनी केली पाहिजे. त्या संगीतातला गोडवा जपण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शासन स्तरावर या संगीत कलेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
बेल्हे येथील पहाडी आवाज असणारे हुरहुन्नरी कलाकार म्हणजेच शाहिर विलास अटक हे होय. मनमिळाऊ स्वभावाने त्यांच्या शाहिरीला दाद मिळते. त्याच तन्मयतेने आवाजातील सरस्वती देवता त्यांना प्रसन्न झाली आहे. ढोलकीची थाप अन् हलगीचा कडकडाट यातून पहाडी आवाजात सुरू होणारी शाहिरी रसिक प्रेक्षकांना आजही खिळवून ठेवते. गाडी घुंगराची… या त्यांच्या गाण्याने त्यांना प्रेक्षकांनी एका उंचीवर नेऊन ठेवले. तमाशात मुख्य शाहिरी सादर करताना त्यांच्या आवाजाला प्रेक्षक आजही दाद देतात. (Junnar News)
तमाशातील गण, गवळण, पोवाडा, नांदी असो की भैरवी यातून त्यांनी केलेले सादरीकरण अंगावर शहारे आणणारे असते. त्यांच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला पुणे, मुंबई, नाशिक, नगर या भागातून अधिक मागणी असते. त्यांच्या या कार्यक्रमात देखील आवाजातून सुरू शाहिरी भाषा प्रेक्षकांना प्रोत्साहित करते. समाज प्रबोधनासारखे कार्यक्रम करण्याची त्यांची इच्छा आहे. लोकशिक्षण, आरोग्य, स्वच्छता, यावर गितातून कार्यक्रम करून समाजहित जोपासणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
आजही हे कलाकार जुन्या तमाशा व वादनाच्या आठवणींना उजाळा देतात. त्यातून नवोदित कलाकार घडविण्याचे काम देखील करतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News : राजूर येथे जागतिक हृदय रोग दिनी शंभर रुग्णांची हृदय रोग, रक्तदाब तपासणी