संतोष पवार
पळसदेव : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवणार असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुण्याचे सहसंचालक डॉ. शोभा खंदारे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
परिपत्रकात म्हटले आहे कि, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची अंमलबजावणी सन 2022-23 मध्ये अतिशय यशस्वीपणे झाली होती. देशभरातील नागरिकांनी आपापल्या घरांवर तिरंगा झेंडा फडकविला होता. तसेच ऑगस्ट 2023 मध्ये सहा कोटी नागरिकांनी सेल्फी विथ तिरंगा उपक्रमात सहभागी होत आपले तिरंग्यासोबतचे फोटो दिलेल्या वेबसाईटवर अपलोड केले होते.
यंदाच्या वर्षीही 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकांनी आपापल्या घरांवर तिरंगा झेंडा फडकवावा. तसेच त्याबरोबरचे सेल्फी www.harghartiranga.com वेबसाईटवर अपलोड करावेत, याविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि शाळांच्या मुख्याध्यापकांना प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून सुचित करावे.
नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन त्यांचे व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करावेत. प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2024 या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या अधिनस्त सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमध्ये झेंडा फडकविण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल. या दृष्टीने कार्यवाही करावी असे परिपत्रकात नमूद केले आहे.