बापू मुळीक
सासवड: जेजुरी गावच्या हद्दीत मोरगाव चौक येथुन एका व्यक्तीला वाटेत अडवून जबरदस्तीने चार चाकी गाडीत बसवून दूर शेतात नेत डोक्याला रिवाल्वर लावून 5 लाख रुपयांची मागणी करून धमकावल्याची घटना घडली आहे. बजरंग हनुमंत पवार असे धमकावल्या गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार नारायण जाधव (रा. जेजुरी) हर्षल गरुड (रा. बेलसर) याच्यासह पाच जणांविरुद्ध जेजुरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी फिर्यादी बजरंग हनुमंत पवार यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. जेजुरी पोलीस स्टेशन गु.र. नं. 161/ 2025 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 कलम 308(2), 137 (2 ),140 (2 ),352 351(2,3), 189 (2), 191 (2 )आर्म अॅक्ट 3(25 ) नुसार पोलीस हवालदार बनसोडे दशरथ यांनी तक्रार दाखल करून घेतली. पुढील तपास जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.ई. पाटील करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यातदार बजरंग हनुमंत पवार हे आपले कामकाज उरकून मोटरसायकल वरून घरी जात असताना, हर्षल गरुड व त्यांच्या सोबत असणाऱ्या इसमाने मोटारसायकलवरून येत त्यांच्या दुचाकीसमोर मोटरसायकल आडवी लावली. त्यानंतर त्यांच्या गाडीची चावी काढून घेतली. तुम्ही मला का थांबवत आहात. असे फिर्यादी यांनी विचारले असता ओंकार भाऊ येत आहेत, असे त्यांना सांगण्यात आले.
तेवढ्यात पांढऱ्या रंगाची फॉर्च्यूनर चार चाकी गाडी नंबर एम. एच. बारा. एल झेड 91 91 ही फिर्यादी यांच्या जवळ आली. त्यामध्ये तीन इसम होते, त्यातील फिर्यादी बजरंग यांच्या ओळखीचा इसम ओंकार जाधव होता, त्या सर्वांनी मिळून जबरदस्तीने ढकलून, फिर्यादी यांना गाडीत बसवले. त्यानंतर पुढे मावडी पिंपरी या गावच्या हद्दीत एका शेतात नेऊन, ओंकार याने अर्वाच्य भाषा वापरत, तुला बोलावले असता येत नाही? अशी विचारणा केली. त्यावर फिर्यादी यांनी मी नोकरीला आहे, तेव्हा मला भेटता येत नाही, असे सांगितले.
त्यानंतर तीन व्यक्तींना त्यांनी गाडीतून खाली उतरवले. तर गाडीत ओंकार व हर्षल दोघेच फिर्यादी यांच्या सोबत गाडीत बसले. त्यानंतर फिर्यादी यांच्या डोक्याला रिवाल्वर लावला म्हणाले की, तू जेजुरी एम.आय.डी.सी मधील कंपन्याचे वेस्टेज घेतो तेव्हा पाच लाख रुपयांची मागणी फिर्यादी यांच्याकडे केली. जर पैसे दिले नाही, तर गौतमचे जे केले आहे, ते तुझे करावे लागेल, अशी धमकी फिर्यादी यांना दिली.
तर हर्षल गरुड याने सांगितले की, प्रत्येक महिन्याला 50 हजार रुपये आणून द्यायचे, एवढी पोरं मला सांभाळावी लागतात, ती काही बारीक पोरं नाहीत, कमरेला घोडा लावून फिरणारी मुले आहेत. तेव्हा तुला मारायला मला वेळ लागणार नाही, अशी ही धमकी आरोपींनी फिर्यातदार यांना दिली. त्यानंतर त्यांनी पुन्हा फिर्यातदार यांना गाडीत बसवले व मोरगावच्या चौक येथे त्यांच्या मोटार सायकल जवळ सोडले. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेले.