पुणे : जांभळांची बाजारात आवक सुरू झाली आहे. मात्र ती अपेक्षित प्रमाणात झाली नसल्याने जांभूळ यंदा भाव खात असल्याचे दिसत आहे. जांभळाचे कमी झालेले उत्पादन आणि वाढलेली मागणी या पार्श्वभूमीवर पन्नास ते साठ रुपये किलो विक्री होणाऱ्या या जांभळाचा भाव २०० ते ३०० रुपयापर्यंत प्रतिकीलो पोहचला आहे. जांभूळ फळाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पावसाळ्याच्या उंबरठ्यावर मृग नक्षत्रात जांभळाच्या झाडावर फळे येतात. पोटाच्या विकारावर जांभूळ गुणकारी आहे. त्यामुळे सध्या प्रतवारीनुसार ३०० रुपये किलोपर्यंत जांभळांची विक्री केली जात आहे. त्यास ग्राहकांकडून ही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुणे शहरात शेतकऱ्यांची दररोज हजारो रुपयांची उलाढाल या माध्यमातून होत आहे. आरोग्यासाठी गुणकारी जांभूळ फळाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. विविध आजारांवर गुणकारी असल्यामुळे पावसाळा सुरू होताच ग्राहकांकडून मागणी वाढते. वात, कफ, पित्त अशा आजारांवर जांभूळ उपयुक्त ठरते. तसेच विविध औषधांमध्ये जांभळासह बियांचा वापर होतो. यंदा जांभळांची आवक कमी दिसत आहे. शहरात विविध ठिकाणी जांभळे विक्री करणाऱ्या गाड्या उभ्या राहत असून यंदा जांभळाला चांगला भाव मिळत असल्याचे किरकोळ विक्रेते सांगत आहेत.