राहुलकुमार अवचट
यवत : पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेतजमिनीला पाणी पुरविण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना राबविण्यात आली. पुणे महानगरपालिकेने खडकवासला प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी आरक्षित केल्यामुळे जनाई-शिरसाई योजनेला पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही व लाभधारक शेतकऱ्यांना योजनेसाठी मंजूर असलेल्या ३.६. टिएमसी पाण्याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने या अनुषंगाने या प्रकल्पांतर्गत कालव्यांच्या माध्यमातून पाण्याचे वितरण करण्याऐवजी बंद नलिका वितरण प्रणाली (पाईपलाईन) राबवून पाण्याचा वहनव्यय कमी होऊन योग्य दाबाने शेतीसाठी पाणी मिळू शकेल, यासाठी जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे (पाईपलाईन) राबविण्याबाबत प्रस्ताव जलसंपदा विभागामार्फत ‘एसएलडीएसी’ येथे सादर करण्यात आला आहे.
या प्रस्तावाचा आराखडा व त्यामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट आहेत, याची माहिती लाभधारक शेतकऱ्यांना मिळावी यासाठी आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ, उपअभियंता जनाई-शिरसाई एस. एस. साळुंके, भाजपा तालुका अध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, किसान मोर्चा अध्यक्ष अरुण आटोळे तसेच जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेचे लाभधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी संबंधित लाभधारकांच्या मागणी व सूचना विचारात घेऊन प्रस्ताव तयार करून पुढील मान्यतेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिले.