मुंबई : राज्य सरकारने आयटीआय विद्यार्थ्यांना मागील अनेक वर्षांपासून४० रुपये विद्यावेतन देण्यात येत होते. आता, त्यात वाढ होणार असून ५०० रुपयांचे विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली आहे.
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून दरमहा ४० रुपये विद्यावेतन देण्यात येत होते. वाढत्या महागाईच्या काळात हे विद्यावेतन अतिशय कमी आहे, यामुळे त्यांच्या वेतनमध्ये वाढ करण्याची मागणी आज विधानसभेत आमदार विक्रम काळे, डॉ. सुधीर तांबे, सतिश चव्हाण, बाळाराम पाटील यांनी केली होती.
यावर उत्तर देताना, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर देताना विद्यावेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.
राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांसाठी असलेले विद्यावेतन हे ४० रुपयांवरून ५०० रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. संबंधित प्रस्ताव हा मंत्रीमंडळासमोर मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली.