लोणी काळभोर : आज जगामध्ये सर्वश्रेष्ठ असे संविधान म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाकडे पाहिले जाते. भारतामध्ये विविध जात, धर्म, पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याचे कारणही भारतीय संविधान आहे. आज आपला भारत देश हा जगातील अफाट लोकसंख्येचा देश आहे. सर्व नागरिकांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम याच भारतीय संविधानाने केल्याने भारतीय संविधान आज भारतीय समाजव्यवस्थेचा आत्मा आहे, असे प्रा. सोमनाथ कुंभार यांनी सांगितले.
लोणी काळभोर येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाच्या प्राध्यापक प्रबोधिनीच्या आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनानिमित्त सोमवारी (ता.25) बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. मंजूळकर, प्रा. एस. पी. कुदळे, डॉ. नेहा बुरगूल, इतर प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
प्रा. कुंभार पुढे म्हणाले, ‘भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान केले आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी आपली कर्तव्य पार पाडल्यास आपला देश सर्व दृष्टीने विकसित व प्रबळ होईल’, असा विश्वास त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांनी भारतीय राज्यघटनेतील प्रत्येक शब्दाचे तंतोतंत पालन केल्यास देशात एक आदर्श समाजव्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रमुख प्रा. एस. पी. कुदळे यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. नेहा बुरगुल यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.